पोलिओ इंजेक्शनचा तुटवडा : पालकांमध्ये भीतीचे वातावरण सुमेध वाघमारे नागपूर पोलिओ आजाराने रुग्णाला कायमचे शारीरिक अपंगत्व येते. मात्र, ‘पोलिओ लसीकरण’ मोहिमेमुळे या दुर्धर आजाराचे समूळ उच्चाटन होत असतानाच गेल्या दोन महिन्यांपासून इंजेक्शनने देण्यात येणाऱ्या पोलिओ लसीचा (आयपीव्ही) तुटवडा पडला आहे. परिणामी, बाळाच्या संगोपनातला महत्त्वाचा घटक असलेल्या लसीकरण मोहिमेवर संशयाने पाहिले जात आहे. लसीकरण हे बालमृत्यू कमी करण्याचा एक खात्रीचा व अत्यंत सोपा मार्ग आहे. कारण लसीकरणाने अनेक घातक आजारांपासून मुक्तता किंवा प्रतिबंध करून नियंत्रणात ठेवण्यास मदत झालेली आहे. पोलिओ हा आजार विषाणू (व्हायरस) पासून होतो. हे विषाणू तीन प्रकारचे असतात. ‘टाईप १, २ आणि ३. यापैकी कोणत्याही एका विषाणूपासून हा आजार उद्भवू शकतो. हे विषाणू वातावरणात फक्त मानवाच्या आतड्यामध्ये आढळून येतात व ते विष्ठेद्वारे बाहेर पडतात. पाण्यात मिसळतात व पाणी दूषित होते. हे दूषित पाणी पिल्यास हा आजार होण्याची शक्यता असते. विशेषत: शून्य ते पाच वर्षे या वयोगटात हा आजार होण्याची दाट शक्यता असते. शरीरात प्रवेश केल्यानंतर हे विषाणू मेंदू व मज्जारज्जूमधील पेशींवर परिणाम करतात व पोलिओचा आजार होतो. त्यामुळे कायमचे अपंगत्व येण्याची शक्यता असते. या आजारावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पोलिओची लस दिली जाते. ही लस दोन प्रकारची असते. एक तोंडावाटे (ओरल पोलिओ वॅक्सिन-ओपीव्ही), तर दुसरी इंजेक्शनद्वारे दिली जाणारी (इंजेक्टेबल पोलिओ वॅक्सिन-आयपीव्ही) लस असते. ‘आयपीव्ही’ लसीचे फायदे तज्ज्ञानुसार, ‘ओपीव्ही’ ही लस पोलिओच्या विषाणूपासून तयार केलेली असते. या लसीमध्ये पोलिओचे विषाणू अर्धवट मृत अवस्थेत असतात. मात्र यामुळे क्वचित प्रसंगी या विषाणूपासून आजार उद्भवू शकतो. या विषाणूमध्ये जनुकीय बदल झाल्यास नवीन विषाणू तयार होऊन त्यापासून आजार होऊ शकतो. ज्या मुलांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी राहते, त्यांना देता येत नाही. परंतु ‘आयपीव्ही’ लसीमध्ये पोलिओचे तिन्ही विषाणू- टाईप एक ते तीन हे पूर्णपणे मृत (किल्ड) स्वरूपात असतात. या लसीचे फायदे म्हणजे, विषाणू पूर्ण मृत असल्याने कोणताही धोका राहत नाही. रोग प्रतिकारक शक्ती तयार करण्याची क्षमता चांगली असते आणि ज्या मुलांमध्ये जन्मत: किंवा जन्मल्यानंतर रोग प्रतिकारक शक्ती करणारे आजार असतील त्यांनाही ही लस देता येते.
कसे होणार पोलिओचे उच्चाटन ?
By admin | Published: July 29, 2016 2:52 AM