नागपूर : राज्य सरकारने ऑगस्ट महिन्यापासून पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरती करण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र, जोवर १०० टक्के विद्यार्थी आधार नोंदणी होत नाही आणि शिक्षकांची सद्य:स्थिती कळत नाही, तोवर शिक्षक भरती कशी करणार, असा सवाल महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने उपस्थित केला आहे. यासंदर्भात महामंडळाचे सरकार्यवाह रवींद्र फडणवीस यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना पत्र पाठवित पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरती प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी अनेक बाबींची पूर्तता करणे आवश्यक असल्याचे नमूद केले आहे.
पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरती सुरू करीत असताना त्याकरिता १५ दिवसात संच मान्यता व रोस्टर पूर्ण करण्यासंबंधीचे प्रतिपादनदेखील शासनाने उच्च न्यायालयात केले आहे. परंतु, आधार नोंदणी अपूर्ण असताना शाळांची संच मान्यता केल्यास मोठ्या प्रमाणात शिक्षक अतिरिक्त होण्याची शक्यता आहे. अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाशिवाय शिक्षक भरती करणे अशक्य आहे, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.
पवित्र पोर्टलवर शिक्षक भरती करण्याआधी स्थानिक वृत्तपत्रांमध्ये जाहिराती देणे आवश्यक असून, स्थानिक सेवायोजन कार्यालयांना कळविणेही आवश्यक आहे. त्यांच्याकडून येणाऱ्या यादीतून पात्र उमेदवारांना मुलाखतीला बोलावण्याचे अधिकार शाळा समितीला असल्याचे उच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश असताना शासनाने प्रथम १:१० व आता १:३ उमेदवार पवित्र पोर्टलमार्फतच्या राज्यस्तरीय यादीतून देण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. हा निर्णय न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणारा असून, संस्था चालकांच्या हक्कांवर गदा आणणारा असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे.