मनपा सभेत सत्ताधारी-विरोधकांत खडाजंंगी : आरोग्य सुविधांची जबाबदारी मनपाचीच
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आरोग्य, शिक्षण व पाणीपुरवठा अशा मूलभूत सुविधा उपलब्ध करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत अनेकांचे बळी गेले. यातून धडा घेत दुसऱ्या लाटेची तयारी केली असती, तर रुग्णांना बेडसाठी भटकंती करावी लागली नसती. हजारो लोकांचे बळी गेले नसते. यानंतरही महापालिकेने अर्थसंकल्पात आरोग्यासाठी ठोस अशी तरतूद केली नाही. आजवर आकड्यांचा खेळ सुरू होता, तर आता निव्वळ शब्दांचा खेळ आहे. यातून मनपाची आरोग्य यंत्रणा सुधारणार नाही, अशी घणाघाती टीका विरोधकांनी सोमवारी मनपाच्या विशेष सभेत अर्थसंल्पावरील चर्चेदरम्यान केली, तर विरोधकांचा आरोप चुकीचा असून, मागील १४ वर्षांच्या भाजपच्या सत्ता काळात शहराचा विकास झाल्याचा दावा सत्ताधाऱ्यांनी केला.
काँग्रेसचे नगरसेवक प्रफुल्ल गुडधे म्हणाले, शहरातील नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे; परंतु अर्थसंकल्पात प्रस्तावित ७५ आरोग्य सुविधा केंद्र खासगी संस्थांनी चालवावे, अशी अपेक्षा केली आहे. महापौर दृष्टी सुधार योजना, महापौर नेत्र ज्योती योजना शासनाच्या विविध योजनांचा लाभ खासगी संस्थांच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न आहे. यासाठी मनपाने कोणतीही निधीची तरतूद केलेली नाही. महापौर जीवनावश्यक औषधी व महापौर वैद्यकीय सामग्री अधिकोष योजना खासगी व सामाजिक संस्थांच्या माध्यमातून या योजना राबविण्याचा मनपाचा मानस आहे.
२७९६ कोटींच्या अर्थसंकल्पात शासन अनुदानाचा मोठा वाटा आहे. मनपातील भाजपच्या १४ वर्षांच्या सत्ताकाळात घोषणा करण्यात आलेले अनेक प्रकल्प कागदावरच आहेत. ऑरेंज सिटी स्ट्रीट, नवीन बाजारांची निर्मिती केली नाही. शहर विकासाचा आराखडा कागदावरच आहे. माजी स्थायी समिती अध्यक्ष विजय झलके यांनी आपली व्यथा चर्चेदरम्यान मांडली आहे. त्यांना इच्छा असूनही गेल्या वर्षात विकास कामे करता आलेली नाहीत; परंतु त्यांना पुन्हा संधी मिळाली नाही. कर आकारणी करताना मूल्यांकनाचा घोळ घातल्याने मालमत्ता कराची थकबाकी वाढली. उत्पन्न वाढविण्यासाठी ठोस प्रयत्न केले नाहीत, असा आरोप प्रफुल्ल गुडधे यांनी केला.
राष्ट्रवादीचे दुणेश्वर पेठे यांनी कोविड काळात शहरात ५ हजार लोकांचा बळी गेल्याचे सांगत एखादा सिमेंट रोड झाला नाही तर काही फरक पडणार नाही; परंतु आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी बजेटमधे मोठी तरतूद करण्याची मागणी केली.
सत्ता पक्षनेते अविनाश ठाकरे यांनी गुडधे यांचा आरोप चुकीचा असल्याचे सांगितले. मागील १४ वर्षांच्या कार्यकाळात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात शहराचा विकास झाल्याचा दावा केला. नागपूर मनपात भाजपची सत्ता असल्याने राज्य सरकारकडून मनपाची अडवणूक केली जात आहे. विकास आराखड्यानुसार विकास होत असल्याचा दावा त्यांनी केला.
...
५०० कोटींची तरतूद करा
कोरोनामुळे बळी गेलेल्यांचा विचार करता संभाव्य तिसरी लाट लक्षात घेता अर्थसंकल्पात आरोग्य सुविधांसाठी ५०० कोटींची तरतूद करण्याची मागणी विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी केली, तसेच प्रत्येक विधानसभा क्षेत्रात मनपाचे हॉस्पिटल उभारण्यात यावे, अशी मागणी केली. बसपाचे जितेंद्र घोडेस्वार यांनीही प्रत्येक विधानसभा क्षेत्रात हॉस्पिटल उभारण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्याची मागणी केली.
....
गुडधे यांचा सभात्याग
प्रफुल्ल गुडधे यांनी आपल्या भाषणातून सत्ता पक्षावर घणाघाती टीका केल्याने सत्ता पक्षातील धर्मपाल मेश्राम व प्रवीण दटके यांनी पॉइंट ऑफ ऑर्डरच्या माध्यमातून आक्षेप घेतला. सभागृहात चुकीची माहिती देत असल्याचा आरोप केला. यावर गुडधे म्हणाले, आम्ही सत्ता पक्षाच्या सदस्यांच्या भाषणात अडथळा आणला नाही. मात्र, माझ्या भाषणात वारंवार व्यत्यय आणला जात आहे. मला बोलू द्यायचे नसेल तर मी सभात्याग करतो, असे म्हणत गुडधे यांनी सभात्याग केला. महापौर दयाशंकर तिवारी यांनी पॉइंट ऑफ ऑर्डर घेत असल्याचे स्पष्ट केले. गुडधे यांच्या सभात्यागानंतर विरोधकांनी गोंधळ घातला. लोकशाहीत प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार असल्याचे सांगितले.
...