दिनकर ठवळे
कोराडी: जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढतो आहे. घराच्या आजूबाजूला कोरोनाचे रुग्ण. सोशल मीडियावरून मिळणारे संदेश. त्यातच आप्तस्वकीय, मित्र मंडळींचा मृत्यू झाल्याच्या बातम्यामुळे अनेकांवर दडपणही येत आहे. अशात रुग्णाची प्रतिकारशक्ती कमी होऊन त्याचे शरीर औषधांना प्रतिसाद देत नाही.
मात्र नांदा-कोराडी येथील ३० वर्षीय आकाश सावरकर याने इच्छिशक्तीच्या बळावर मेयो येथील डॉक्टरांचा उपचार घेत कोरोनावर मात केली आहे. या युवकाला रुग्णालयात दाखल केले तेव्हा त्याचा एचआरसीटी स्कोर २५ होता तर ऑक्सिजन लेव्हल ७२ होती. त्यामुळे त्याला धोका अधिक होता. योग्य उपचार घेत तो आता सुखरूप घरी परतला. आकाशला औषध उपचारादरम्यान रेमडेसिविर इंजेक्शन देण्यात आले नसल्याची माहिती त्याच्यावर उपचार करणारे वैद्यकीय अधिकारी इंदू भिमटे यांनी दिली. आकाशला एप्रिलच्या सुरुवातीला कोरोनाची लक्षणे दिसायला लागली. त्याने काही दिवस खासगी उपचार केले. स्थानिक डॉक्टरांनी त्याला कोरोनाची चाचणी करण्यास सांगितले.
७ एप्रिला त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. यानंतर खासगी रुग्णालयात काही दिवस उपचार घेतल्यानंतर त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. सीटी स्कॅनमध्ये त्याचा स्कोअर २५ आला. डॉक्टरांनी त्याला अॅडमिट होण्याचा सल्ला दिला. मात्र कुठेही बेड उपलब्ध नव्हता. शेवटी मेयोत बेड मिळाला. येथे त्याला ५ दिवस ऑक्सिजन देण्यात आले. नंतर आयसीयूमध्ये शिफ्ट करण्यात आले. यात ऑक्सिजन लेव्हल ७२ वर कायम राहिल्याने त्याला व्हेंटिलेटरची गरज भासली. तीन ते चार दिवस त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. उपचाराला त्याने प्रतिसाद दिला. यानंतर त्याला सर्वसाधारण वॉर्डात दाखल करण्यात आले. ३० एप्रिलला तो पूर्णपणे बरा झाला. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर मी केवळ सकारात्मक विचार करत होतो. सोशल मीडियापासून दूर होतो. आवडणारे गाणी ऐकली. याचा उपचारादरम्यान अधिक फायदा झाला असे आकाश सांगतो.