योगेश पांडे
नागपूर : बारावीच्या निकालात यंदा प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या नागपूर विभागातील विद्यार्थ्यांमध्ये थोडीथोडकी नव्हे तर तब्बल ६९ टक्क्यांची घट झाली आहे. मागील तीन वर्षांपासून प्रावीण्य श्रेणीच्या विद्यार्थ्यांमध्ये सातत्याने घट होत आहे. शिवाय विभागात ‘फर्स्ट क्लास’ उत्तीर्ण झालेल्यांची संख्यादेखील कमी झाली आहे. २३.६० टक्के विद्यार्थी या श्रेणीत आहेत. अर्ध्याहून अधिक विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. दर दोन विद्यार्थ्यांमागे एक विद्यार्थी या श्रेणीतील आहे.
२०२१ साली वर्षी गुणांची खैरात वाटल्याने नागपूर विभागात थोडे-थोडके नव्हे तर ६५ हजार ७६५ विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले होते. २०२२ मध्ये हाच आकडा २१ हजार ९०० इतका होता. यंदा एकूण विद्यार्थ्यांचा विचार केला असता ४.९० टक्के विद्यार्थीच प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
नागपूर विभागात एकूण १ लाख ५२ हजार १२१ पैकी १ लाख ३७ हजार ४५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. एकूण परीक्षार्थ्यांपैकी ३२ हजार ४५४ विद्यार्थी प्रथम श्रेणीत आले आहेत. यांची टक्केवारी २३.६१ टक्के इतकी आहे. मागील वर्षी हा आकडा ३९ टक्क्यांहून अधिक होता. द्वितीय श्रेणीत ७१ हजार ३५९ म्हणजेच ५१.९१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत द्वितीय श्रेणीत १३.५२ टक्के अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. सर्वात जास्त विद्यार्थी याच श्रेणीत आहेत.