गोंदिया : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेचा निकाल गुरुवारी (दि.२५) जाहीर करण्यात आला. यात गोंदिया जिल्ह्याचा एकूण निकाल ९३.४३ टक्के लागला असून, जिल्हा नागपूर विभागात अव्वल ठरला आहे. स्थानिक विवेक मंदिर विद्यालयाची वाणिज्य शाखेची पर्व अग्रवाल हिने ९७.३३ टक्के गुण प्राप्त करुन जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकाविला, तर विवेक मंदिर विद्यालयाची त्रशिता साखला व तरंग मुलचंदानी यांनी ९६.६७ टक्के गुण प्राप्त करुन व्दितीय क्रमांक पटकाविला आहे. एस.एम.पटेल महाविद्यालयाचे दिव्या पहिरे व लक्ष अग्रवाल यांनी ९६.३३ टक्के गुण प्राप्त करुन जिल्ह्यातून तृतीय क्रमांक पटकाविला.
विज्ञान शाखेत आमगाव येथील आदर्श विद्यालयाचा आयुष विजय डोंगरे याने ९५.१७ टक्के गुण घेऊन जिल्ह्यातून प्रथम तर अर्जुनी मोरगाव येथील सरस्वती विद्यालयाची हितेश्वरी शहारे ९४.६७ टक्के गुण घेऊन जिल्ह्यात व्दितीय आली. कला शाखेत नमाद महाविद्यालयाची लिपाक्षी नांदगाये हिने ९०.८५ टक्के गुण घेऊन प्रथम व आमगाव येथील आदर्श विद्यालयाची शीतल सिंदाने हिने ८५.८३ व्दितीय क्रमांक प्राप्त केला. बारावीच्या परीक्षेला जिल्ह्यातील एकूण १९ हजार ४१४ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १७ हजार १७९२९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.