आनंद डेकाटे
नागपूर : निकालाच्या दिवशी आपले पाल्य कसे पास होते याकडे आईवडिलांचे विशेष लक्ष लागलेले असते. कारण, तो त्यांच्या आयुष्यातला एक सर्वांत मोठा आनंदाचा व सार्थकतेचा क्षण असतो. मात्र, यंदाच्या निकालाने असा क्षण अनुभवण्याची संधी चक्क दोन बहिणींना मिळाली आहे. कारण, खुद्द त्यांची आई बारावीत उत्तम गुणांनी पास झाली आहे. शुभांगी खुबाळकर असे या उत्तीर्ण झालेल्या आईचे नाव.
घरची परिस्थिती आणि लग्नामुळे शिक्षण अर्धवटच राहिलेल्या मुलींची संख्या कमी नाही. पुढे संसारात रमून आपल्या मुला-बाळांच्याच शिक्षणासाठी झटण्यात दिवस निघून जातात. परंतु अर्धवट राहिलेले शिक्षण जिद्दीने पूर्ण करणाऱ्या महिलांची संख्याही कमी नाही. यापैकीच एक म्हणजे शुभांगी होत. शुभांगी यांच्या घरची परिस्थती बेताचीच. त्यामुळे शिक्षण पूर्ण करता आले नाही. ९ व्या वर्गापर्यंतच शिकता आले. पुढे लग्न झाले आणि शिकायचे राहून गेले. मुली झाल्या. त्यांच्याच शिक्षणाचे स्वप्न पाहायला लागल्या. शुभांगी या सदर परिसरातील जाईबाई चौधरी ज्ञानपीठ या महाविद्यालयात प्युनचे काम करतात. पती गजेंद्र हे स्टार बसमध्ये कंडक्टर आहेत. त्यांना प्रांजली व खुशी या दोन मुली आहेत. या दोन्ही मुली याच शाळेत शिकतात. सध्या प्रांजली ही बी.कॉम करतेय तर लहान मुलगी ९ व्या वर्गात आहे. प्राचार्य सुधाकर चौधरी यांनी शुभांगी यांना दहावी पूर्ण करण्यास प्रोत्साहित केले. परंतु ज्या शाळेत मुली शिकताहेत तिथे आपण कसे शिकू, या विचारानेच त्यांची हिंमत होत नव्हती. मात्र, त्यांनी मनावर घेतले. दहावीची परीक्षा दिली. पहिल्याच प्रयत्नात शुभांगी दहावी झाल्या. यंदा बारावीची परीक्षाही त्यांनी ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण केली. त्यांच्या या यशामुळे त्यांना तर आनंद झालाच आहे परंतु सर्वाधिक आनंद आपली आई पास झाल्याने दोन्ही मुलींना झालाय.
- मुलगीच घ्यायची आईचा अभ्यास
मोठी मुलगी प्रांजली ही आईचा अभ्यास घ्यायची. दहावी व बारावीतही तिने आईला अभ्यासात मदत केली. यासोबतच शाळेतील शिक्षक व इतर मुलींनीही त्यांना खूप मदत केली. विशेष म्हणजे प्राचार्य सुधाकर चौधरी यांच्यामुळेच त्यांना प्रेरणा मिळाली. शुभांगी यांना आता अजून शिकायचे असून, यात त्यांना त्यांच्या मुलींचा पूर्ण सपोर्ट मिळणार आहे.