नागपूर/अमरावती : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेचा ऑनलाइन निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. यात, गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव येथील विद्यार्थी अमन अग्रवाल याने ९९ टक्के (५९४ गुण) प्राप्त करीत अव्वल क्रमांक पटकावला आहे. तो विज्ञान शाखेचा विद्यार्थी आहे. वाणिज्य शाखेत अमरावती येथील केशरबाई लाहोटी वाणिज्य महाविद्यालयाची विद्यार्थिनी समृद्धी मुंदडा हिने ९८ टक्के गुण प्राप्त करीत पहिले स्थान पटकाविले.
मागील वर्षीच्या तुलनेत नागपूर विभागाचा निकाल ३.१ टक्क्यांनी घटला असला तरी, राज्यात विभागाने झेप घेतली आहे. राज्यात विभागाचा दुसरा क्रमांक आहे. संपूर्ण विभागाची आकडेवारी ९६.५२ टक्के आहे, तर अमरावती विभाग त्याखालोखाल तिसऱ्या स्थानावर असून, विभागातील ९६.३४ टक्के परीक्षार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
नागपूरच्या सेंट पॉल ज्युनिअर कॉलेज येथील विद्यार्थिनी उर्वी शाहा हिने ९७.८३ टक्के (५८७ गुण) प्राप्त करीत दुसरा क्रमांक मिळविला. कला शाखेतून नागपुरातील ‘एलएडी’ महिला महाविद्यालयातील विद्यार्थिनी तुलसी चौधरी हिने ९४.८३ टक्के (५६९ गुण) मिळवीत पहिले स्थान पटकाविले.
नागपूर विभागात एकूण १ लाख ५९ हजार १०६ पैकी १ लाख ५३ हजार ५८४ परीक्षार्थींनी यश संपादन केले, तर अमरावती विभागात १ लाख ५० हजार ११० पैकी १ लाख ४४ हजार ६१८ परीक्षार्थी उत्तीर्ण झाले.
नेहमीप्रमाणे मुलींनीच बाजी मारली असून, उत्तीर्णांमध्येदेखील विद्यार्थिनींचेच प्रमाण जास्त आहे. नागपूर विभागातून ७७ हजार ७७९ विद्यार्थिनींनी परीक्षा दिली व त्यातील ७५ हजार ८१२ उत्तीर्ण झाल्या. त्यांच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९७.४७ टक्के आहे, तर विद्यार्थ्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९५.६२ टक्के आहे. अमरावती विभागातून ९६.९६ टक्के विद्यार्थिनी व ९५.८२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले.