लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : खासगी कंपनीतील निवृत्त अधिकाऱ्याला शेअर मार्केटमध्ये अल्पावधीत जास्त लाभ मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांच्या सुनेने त्यांच्याकडून तब्बल २५ लाख रुपये हडपले. प्रतापनगर पोलिसांनी याप्रकरणी नंदिनी विजयकुमार ब्रम्हे (वय ३२) नामक आरोपी महिलेला पुण्यातून अटक करून नागपुरात आणले.फिर्यादी दिगांबर गणपतराव क्षीरसागर (वय ७०) हे गायत्रीनगरातील हनुमान मंदिराजवळ राहतात. ते एका खासगी कंपनीत अधिकारी होते. ते शेअर मार्केटमध्ये छोटीमोठी रक्कम गुंतवित होते. पोर्ट फोलिओ कंपनीत एजंट असलेल्या नंदिनीचा त्यातूनच क्षीरसागर यांच्याशी परिचय झाला. त्यानंतर तिचे त्यांच्या घरी जाणे-येणे वाढले. दरम्यान, आपल्या कंपनीच्या माध्यमातून शेअर मार्केटमध्ये रक्कम गुंतविल्यास १० ते १५ टक्के लाभ मिळवून देईल, असे आमिष नंदिीाीने क्षीरसागर यांना दाखविले. तिचे लाघवी बोलणे-वागणे आणि वारंवार घरी येणे, क्षीरसागर यांना एवढे भावले की त्यांनी तिच्यावर विश्वास करून तिला २६ सप्टेंबर २०१७ ला काही रक्कम गुंतविण्यासाठी दिली. त्यानंतर नंदिनीने क्षीरसागर यांचा मुलगा विजयकुमार याच्याशी प्रेमविवाह केला. ती सून म्हणून घरात आल्यानंतर तिने २०१७ ते २९ जानेवारी २०१९ पर्यंत क्षीरसागर यांच्याकडून वेगवेगळी रक्कम उकळून ती शेअर मार्केटमध्ये गुंतविल्याचे भासविले. मात्र, तिच्या वर्तनाचा संशय आला, त्यामुळे त्यांनी नंदिनीला आपली रक्कम परत मागितली असता ती प्रत्येक वेळी जुनी रक्कम काढण्यासाठी पुन्हा नवीन रक्कम भरण्यास सांगत होती. रक्कम भरली नाही तर जुनी रक्कम बुडेल, अशी भीती दाखवत होती. तिने अशाप्रकारे दडपण वाढवून क्षीरसागर यांना आधी दागिने विकायला भाग पाडले. त्यांतर प्लॉट आणि राहते घर गहाण ठेवायला आणि नंतर विक्रीपत्राचा करारनामा करण्यास भाग पाडले.असा झाला उलगडानंदिनीने क्षीरसागर यांच्याकडून दीड वर्षांत तब्बल २५ लाख ५ हजार ५४० रुपये हडपल्यानंतरही तिचे रक्कम मागणे सुरूच होते. लाभांश सोडा मुद्दल रक्कमही मिळत नसल्याने क्षीरसागर यांनी संबंधित कंपनीतील अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता नंदिनीने ही रक्कम गुंतविली नाही तर स्वत: हडपल्याचे स्पष्ट झाले. सासऱ्याची रक्कम हडपल्यानंतर नंदिनी पुण्याला पळून गेली. त्यामुळे क्षीरसागर यांनी प्रतापनगर ठाण्यात तक्रार नोंदवली. एएसआय वसंतराव शेळमाके यांनी शुक्रवारी गुन्हा दाखल करून तिच्या मोबाईलवर संपर्क केला असता आपण पुण्यात आहो, असे तिने सांगितले. तुझ्याविरुद्ध पोलिसांत तक्रार आली आहे. तू तुझे बयान देण्यासाठी लवकर आली नाही आम्हाला गुन्हा दाखल करावा लागेल. त्यामुळे तुला काय सांगायचे आहे, ते तातडीने हजर होऊन सांग. नंतर तुला संधी मिळणार नाही, असा पोलिसांनी धाक दाखवला. ते ऐकून नंदिनी प्रतापनगर ठाण्यात शनिवारी सकाळी दाखल झाली. तिचे बयान नोंदवून घेतल्यानंतर पोलिसांनी तिला फसवणुकीबद्दल विचारले असता ती उडवाउडवीची उत्तरे देऊ लागली. त्यामुळे पोलिसांनी तिला अटक केली.