नागपूर : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर लाखो बांधवांना धम्मदीक्षा दिली. या दिनाचे औचित्य साधून शुक्रवारी दीक्षाभूमीवर भीमसागर उसळला होता. हजारो अनुयायांनी तथागत गौतम बुद्ध व बाबासाहेबांना अभिवादन केले. ‘बुद्धम शरणम् गच्छामी, धम्मम् शरणम् गच्छामी...’, भगवान बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दणाणला होता.
शुक्रवारी शहरातील शेकडो हजारो लोकं कुटुंबासह भोजनाचे साहित्य घेऊन दीक्षाभूमीवर पाेहोचले होते. नागरिक या परिसरातील हिरवळीवर सहकुटुंब भाेजनाचा आस्वाद घेतला. बुद्धविहाराचे सदस्य, महिला मंडळाच्या सदस्यांचा यात मोठ्या प्रमाणावर समावेश होता. बहुतेक उपासक शुभ्र वस्त्र परिधान करून आले होते. दीक्षाभूमी परिसरात पुस्तकांचे, गौतम बुद्ध आणि डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमांचे स्टाॅल सजले आहेत. शुक्रवारी सकाळपासूनच झालेली गर्दी लक्षात घेता काचीपुरा चौकातूनच दीक्षाभूमीकडे जाणारा रस्ता दुपारीच वाहनांसाठी बंद करण्यात आला होता. रात्रीपर्यंत ही गर्दी कायम होती. अनुयायी रांगेने स्तुपात जाऊन बाबासाहेबांच्या अस्थिकलशाला अभिवादन करीत होते. दीक्षाभूमीसोबतच संविधान चौक व शहरात ठिकठिकाणी धम्मक्रांती दिन साजरा करण्यात आला.
- ससाईंनी दिली अनुयायांना धम्मदीक्षा व २२ प्रतिज्ञा
दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या नेतृत्वात भिक्खू व भिक्खूंनी संघाने दीक्षाभूमी येथे उपस्थित बांधवांना त्रिशरण पंचशील आणि २२ प्रतिज्ञा दिली. यावेळी ससाईंनी दीक्षाभूमी परिसरात ५० अनुयायांना धम्मदीक्षा दिली.
याप्रसंगी भदंत प्रज्ञा बोधी, भदंत धम्मसारथी, भदंत नागवंश, भदंत नागसेन, भदंत धम्म विजय, भदंत महानाग, भदंत धम्मप्रकाश, भदंत मिलिंद, भदंत धम्मबोधी, भदंत नागाप्रकाश, भदंत महाकश्यप यांच्यासह भिक्खूनी संघांचे संघाप्रिया थेरी, धम्म सुधा, बोधी शीला थेरी, विशाखा, पारमिता, उप्पला वर्ना, सुमेधा (श्रामणेरी), धम्मानंद (श्रामणेरी), वनप्रिया (श्रामणेरी) उपस्थित होत्या.