नागपूर : येथील कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी पहाटे २ च्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत बाजारसमितीत ठेवण्यात आलेली कोट्यवधी रुपयांची मिरची जळून खाक झाली. दरम्यान, काही तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.
कळमना कृषी बाजार समितीमधील एका यार्डमध्ये आज पहाटे २ च्या सुमारास अचानक आगीचे लोळ उठू लागले. बाब लक्षात येताच लोकांनी आरडाओरड सुरू केली. पाहता-पाहता आगीने मोठे रुप धारण केले. या यार्डमध्ये ४ हजारांच्या जवळपास भरलेले पोते होते. यात प्रामुख्याने ७ ते १० अडतीया व व्यापाऱ्यांचा माल होता. यात जवळपास ५ कोटींचे नुकसान झाल्याचे समजते. सकाळी ८ वाजेपर्यंत आग विझविण्याचे कम सुरू होते.
वेळीच घटना स्थळावर १० फायर ब्रिगेडच्या गाड्या पोहोचल्या व आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. मात्र, यात व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून घटनेनंतर व्यापाऱ्यांमध्ये बाजार समिती प्रशासनाविरोधात रोष निर्माण झाला होता. अचानक एकाचवेळी आग कशी लागू शकते? यामागचे नेमके कारण काय, अशा विविध शंका उपस्थित केल्या जात आहेत. या आगीला कृषी उत्पन्न बाजार समिती जबाबदार असून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणीही व्यापाऱ्यांकडून केली जात आहे.