लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पंच महाभूतातील पाणी हा घटक अतिशय महत्त्वाचा आहे. मानवाच्या निर्मितीत पाण्याचे महत्त्व अन्यन्य साधारण आहे. या सृष्टीवरील प्रत्येक जीवाला पाण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे प्रत्येक धर्मग्रंथात पाण्याचा विशेष उल्लेख केला आहे. परंतु दिवसेंदिवस वाढत असलेले पाण्याचे दुर्भिक्ष, भारतच नाही तर संपूर्ण जगाला भेडसावणारी पाण्याची समस्या लक्षात घेता, रमण विज्ञान केंद्राने ‘जल हेच जीवनाचा आधार’ हे सिद्ध करणारी वॉटर गॅलरी तयार केली आहे. अतिशय रंजक पद्धतीने या गॅलरीत पाण्याचे महत्त्व विशद केले आहे.केंद्राच्या परिसरात ३००० चौरस फुटामध्ये ३० मॉडेलच्या माध्यमातून शरीरातील पाण्यापासून जमिनीतील पाण्यापर्यंतची इत्थंभूत माहिती देण्यात आली आहे. गॅलरीच्या प्रवेशद्वारावरच विविध धर्मग्रंथात पाण्याबद्दल लिहिण्यात आलेली महती आहे. पृथ्वीची प्रतिकृती साकारून त्यात असलेले पाणी आणि होत असलेला उपसा याची भीषणता दाखविली आहे. ‘वॉटर इन युवर बॉडी’ या मॉडेलमध्ये आपले वजन आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण बघायला मिळते. त्याचबरोबर मानवाच्या अवयवात जसे मेंदू, हृदय, किडनी, हाड यात किती पाणी आहे आणि त्याचे वजन किती हे बघायला मिळते. ‘वॉटर आॅन अर्थ’ हे मॉडेलच्या माध्यमातून १०० टक्के पाण्यापैकी ३ टक्केच पाणी वापरण्यायोग्य आहे. परंतु त्यातूनही मानवाला केवळ १ टक्काच पाणी मिळत असल्याचे तांत्रिक पद्धतीने सांगण्यात आले आहे. मानवाच्या उत्पत्तीनंतर समाज कुठे वसला. त्याची कारणे कोणती होती, याची माहिती मिळते. पाऊस कसा पडतो, नदीचा प्रवास चलचित्रांच्या माध्यमातून अनुभवायला मिळतो आहे.पृथ्वीवर प्रत्येक गोष्टीसाठी पाणी लागते. आपण खातो ती फळे, भाजीपाला, द्रवपदार्थ, यासाठी किती पाणी लागते याबाबतची अभ्यासपूर्ण माहिती या वॉटर गॅलरीतील विविध मॉडेल व चार्ट्सच्या माध्यमातून सादर करण्यात आलेली आहे. यात प्रत्येक पदार्थाच्या निर्मितीत पाण्याचे प्रमाण दाखविले आहे. पाण्यापासून होणारे आजार, पाण्यामुळे झालेला विनाश, पाण्याच्या संवर्धनाची माहिती, पाण्याची गुणवत्ता तपासणी लॅब, वॉटर ट्रीटमेंट प्लॅण्टमध्ये होणारे काम, प्लास्टिकमुळे झालेले वॉटप पोल्यूशन, भूगर्भातील पाण्याची गोष्ट, वेगवेगळ्या देशात पाण्याची पातळी याची माहिती येथे मिळते. सर्वात शेवटी पाण्याच्या संवर्धनासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंगचे महत्त्व विशद करण्यात आले आहे.जगात पाण्याची समस्या दिवसेंदिवस भीषण होत चालली आहे. भरमसाठ उपशामुळे दिवसेंदिवस जमिनीतील पाण्याचा साठा कमी होत आहे. तरीही लोक पाणी जपून वापरत नाहीत. त्यामुळे याबाबत जनजागृती करण्याच्या आणि पाणी बचतीचे महत्त्व सांगण्याच्या दृष्टीने नागपुरातील रमण विज्ञान केंद्रात वॉटर गॅलरी उभारण्यात आली आहे.मनोजकुमार पांडा, क्युरेटर, रमण विज्ञान केंद्र