लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकांनंतर राजकीय हिंसाचाराच्या घटना घडल्या. यामुळे तेथील सामाजिक समरसतेला मोठा धक्का लागला असून पश्चिम बंगालमध्ये मानवाधिकारांचे रक्षण व्हावे, अशी मागणी बंगाल सहायता समितीतर्फे करण्यात आली आहे. यासंदर्भात समितीने राष्ट्रपती, राज्यपाल, केंद्र शासनाला जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन सादर केले आहे.
पश्चिम बंगालमध्ये राजकीय शत्रुत्वातून सत्ताधाऱ्यांकडून अत्याचार करण्यात येत आहेत. हिंसाचाराचा फटका बसलेल्या नागरिकांचा जीव, आयुष्याचे रक्षण झाले पाहिजे. तसेच दोषींना कठोर शिक्षा मिळायला हवी. त्यासाठी केंद्र सरकारने तत्काळ हस्तक्षेप करायला हवा, अशी मागणी समितीतर्फे करण्यात आली. महाराष्ट्रातील कलाकार, साहित्यिक, उद्योजक, शिक्षणतज्ज्ञांसह सामाजिक कार्यकर्ते व जनसामान्यांचे हे संयुक्त निवेदन असल्याचे समितीतर्फे सांगण्यात आले. यावेळी बंगाल सहायता समितीचे नागपूर संयोजक डॉ. सत्यवान मेश्राम, सुनील किटकरू, राम हरकरे, जयंतराव मुलमुले, अरविन्द कुकड़े, अमित कुशवाह, रवीन्द्र बोकारे, राजेश बोंद्रे, विनय चांगदे, पराग सराफ, समीर गौतम प्रामुख्याने उपस्थित होते.