लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बाल संगोपनाचे काम आणि त्या बदल्यात वर्षाला लाखो रुपये मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका टोळीने सक्करदऱ्यातील महिलेला चार महिन्यांपूर्वी ओमन देशात विकले. तेथे तिचा संबंधितांनी अतोनात छळ केला. संधी मिळताच पीडित महिलेने आपल्या बहिणीला फोन करून या प्रकरणाची माहिती दिल्याने महिलेची विक्री झाल्याच्या प्रकरणाचा भंडाफोड झाला. सक्करदरा पोलिसांनी या प्रकरणी सोमवारी पाच आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून एकाला अटक केली. अन्य चार आरोपींचा शोध घेतला जात आहे.पीडित महिला ३७ वर्षांची आहे. ती सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बहादुरा परिसरात राहते. पतीपासून विभक्त झालेल्या या महिलेला दोन मुली आहेत. तिची आर्थिक स्थिती हलाखीची आहे. हे पाहून आरोपी नसिमा, अकिला, नसरुद्दीन ऊर्फ राजा समसुद्दीन, फिरोज तसेच इम्तियाज या पाच जणांनी तिच्यावर जाळे टाकले. ओमान देशात लहान मुलांचा सांभाळ करणाऱ्या महिलांची आवश्यकता असून, तुला त्यासाठी वर्षाला लाखो रुपये मिळतील. खाण्याची आणि राहण्याची व्यवस्थाही तेथेच आहे. या पैशातून तू तुझे आणि तुझ्या मुलींचे भविष्य चांगले करू शकते, असे आरोपींनी तिला पटवून दिले. तुझी इच्छा झाली तेव्हा तू परत नागपुरात येऊ शकते, असेही आरोपींनी तिला सांगितले. पैशासाठी संघर्ष करणाऱ्या महिलेने आरोपींच्या भूलथापांना खरे मानून मुली सोडून विदेशात कामाला जाण्यास होकार दिला. त्यानुसार, आरोपींनी तिला ६ जुलै २०१८ च्या मध्यरात्री मुंबईहून ओमानला पाठविले.तेथे पोहचल्यावर महिलेकडून घरकामापासून नको ती सर्व कामे करवून घेतली जाऊ लागली. तिला गुलामाप्रमाणे वर्तणूक मिळाल्याने महिलेने त्याला विरोध केला. काम करण्यास नकार दिल्याने तेथील आरोपींनी तिला १ लाख, ५० हजारात विकत घेतल्याचे सांगितले. आरोपींनी आपल्याला विकल्याचे कळाल्याने महिलेला जबर मानसिक धक्का बसला. तिने तेथून सुटका करून घेण्याचे बरेच प्रयत्न केले. मात्र, तिला यश मिळाले नाही. त्यामुळे ती मन मारून तेथे राहू लागली. दरम्यान, चार दिवसांपूर्वी तिला संधी मिळताच तिने आपल्या बहिणीशी संपर्क साधला. आपण ओमानला असून, आपली विक्री झाल्यामुळे येथे आपल्याला गुलामासारखी वागणूक मिळत असल्याची माहिती तिने बहिणीला दिली. ते ऐकून हादरलेल्या फिर्यादीने आपल्या मोहल्ल्यातील सामाजिक कार्यकर्त्यांना ही माहिती सांगितली. बहिणीला ओमानमध्ये विकणाऱ्यांमध्ये भूपेशनगर, शारदा माता चौकात राहणाऱ्या नसिरुद्दीन ऊर्फ राजा याचाही समावेश असल्याचे तिने सांगितले. त्यानंतर लगेच सक्करदरा ठाण्यात तक्रार नोंदवली. ठाणेदार सांदिपान पवार यांनी पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांना या प्रकरणाची माहिती सांगितली. उपायुक्त भरणे यांनी लगेच या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, उपरोक्त पाच आरोपींविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.सूत्रे हलली, महिला सुरक्षितत्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ओमानमधील भारतीय दूतावासाशी संपर्क साधून या प्रकरणाची माहिती दिली. त्यानुसार, महिलेला भारतीय दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित व्यक्तीकडून ताब्यात घेऊन तिला सुरक्षित ठिकाणी ठेवले आहे. तीन चार दिवसात तिला तेथून नागपुरात परत आणले जाणार आहे. इकडे आरोपी नसिरुद्दीन ऊर्फ राजा याला अटक करण्यात आली असून, त्याच्या साथीदारांचा शोध घेतला जात आहे.अशा प्रकारचे गेल्या काही दिवसांतील सक्करदऱ्यातील हे दुसरे प्रकरण आहे. यापूर्वीसुद्धा सक्करदऱ्यातील एका महिलेला एका टोळीने अशाच प्रकारे खाडी देशात विकल्याचे उघडकीस आले होते. या प्रकरणात पोलिसांनी काही आरोपींना अटकही केली आहे.