ब्रिजेश तिवारी
लाेकमत न्यूज नेटवर्क
काेंढाळी : काेंढाळी वनपरिक्षेत्रात वाघ व बिबट्यांच्या तसेच इतर वन्यप्राण्यांच्या संख्येत बरीच वाढ झाली आहे. वन्यप्राण्यांची संख्या व जंगलाचा आकार यात असमताेल निर्माण झाल्याने प्राण्यांनी खाद्याच्या शाेधात त्यांचा माेर्चा शेत व नागरी वस्त्यांकडे वळविला. यातून वाघ व बिबट्यांची चार वर्षात शेतकऱ्यांकडील २४५ गुरांची शिकार केली तर इतर वन्य प्राण्यांचा वावर वाढल्याने पिकांच्या नुकसानीचे प्रमाणही वाढले आहे. हा मानव-वन्यजीव संघर्ष आणखी किती काळ सुरू राहणार, असा प्रश्नही या भागातील नागरिकांना पडला आहे.
कोंढाळी वनपरिक्षेत्र बोर व्याघ्र प्रकल्प (जिल्हा वर्धा) व पेंच व्याघ्र प्रकल्प (ता. पारशिवनी, रामटेक व मध्य प्रदेश) यांच्यामध्ये आहे. त्यामुळे या दाेन्ही व्याघ्र प्रकल्पातील वाघांची ये-जा काेंढाळी वनपरिक्षेत्रातून सुरू असते. विकास कामांच्या नावावर या भागातील समृद्ध वनसंपदा नष्ट करण्यात आल्याने वन्य प्राण्यांचा काॅरिडाेर धाेक्यात आला आहे. या भागातील सात पट्टेदार वाघ व १० बिबट्यांचा वावर आहे. वाघ व बिबट्यांची संख्या वाढली असून, त्यांना वावरायला जंगलाचा आकार कमी पडायला लागल्याने ते खाद्याच्या शाेधात नागरी वस्ती व शेतांकडे याेतात. यातूनच त्यांनी चार वर्षात २४५ गुरांची शिकार केली. यात २०१९ मधील ४३, २०२० मधील ५६ गुरांचा समावेश आहे. इतर वन्यप्राण्यांनी केलेले पिकांचे नुकसान वेगळे आहे. वन विभागाने २०१७ मध्ये २५० शेतकऱ्यांना १९ लाख ३ हजार ३४४ रुपये, २०१८ मध्ये ४४३ शेतकऱ्यांना ४२ लाख ४८ हजार २३४ रुपये तर २०१९ मध्ये ३६७ शेतकऱ्यांना ३६ लाख ४४ हजार ७६४ रुपये नुकसान भरपाई दिली. ही नुकसान भरपाई झालेल्या नुकसानीच्या तुलनेत कमी असल्याचे अनेक शेतकऱ्यांनी सांगितले.
वन्यप्राण्यांमुळे हाेणारे पिकांचे नुकसान टाळण्यासाठी शासनाच्यावतीने वन विभाग श्यामाप्रसाद मुखर्जी जनविकास योजना राबिवते. या याेजनेंतर्गत खापा व किनकीडोडा गावांचा प्रस्ताव सौरऊर्जा कुंपणासाठी शासनाकडे पाठविला आहे. परंतु, त्याला अद्यापही मंजुरी देण्यात आली नाही. वन्य प्राणी अनावधानाने या भागातील शेतातील विहिरीत पडल्याच्याही अनेक घटना घडल्या आहेत. या घटना टाळण्यासाठी या विहिरी उंच बांधण्याचा प्रस्तावही वन विभाागाकडे रखडला आहे.
...
ब्रिटिशकालीन वनपरिक्षेत्र
ब्रिटिशांनी काेंढाळी (ता. काटाेल) येथे वनपरिक्षेत्र कार्यालय सुरू केल्याने हे नागपूर जिल्ह्यातील सर्वात जुने वनपरिक्षेत्र आहे. त्यावेळी नागपूर येथील सेमीनरी हिल्सपर्यंत पसरलेल्या या वनपरिक्षेत्रात सध्याच्या काटोल, नरखेड, कळमेश्वर, हिंगणा तालुक्यातील जंगलांचा समावेश हाेता. या वनपरिक्षेत्रातील खापा, घोटीवाडा, घुबडी, कावडीमेट, रिगणाबोंडी, चमेली, कलमुंडा या भागातील घनदाट जंगलात रोही, रानडुक्कर, हरीण यासह इतर तृणभक्षी प्राण्यांची संख्या बरीच माेठी असल्याने पट्टेदार वाघांचाही वावर हाेता. मात्र, या वन्यप्राण्यांचा सामान्य नागरिक अथवा शेतकऱ्यांना काेणताही त्रास नव्हता. हल्ली दुर्लक्षित असलेल्या या वनपरिक्षेत्रात माेठ्या प्रमाणात वैध व अवैध वृक्षताेड करण्यात आल्याचे एका सर्वेक्षणात शासनाने स्पष्ट केले आहे.
...
प्राण्यांचा अपघाती मृत्यू
या वनपरिक्षेत्रातून नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्ग वन्यप्राण्यांच्या काॅरिडाेरला छेदून गेला आहे. हा राष्ट्रीय महामार्ग ओलांडणे सुकर व सुरक्षित व्हावे, यासाठी वन विभागाने वन्य प्राण्यांसाठी अंडरपास तयार करण्याची तसदीही घेतली नाही. त्यामुळे वर्षभरापूर्वी बाजारगाव परिसरात बाजीराव नामक वाघाचा वाहनाच्या धडकेत अपघाती मृत्यू झाला. साडेचार वर्षाच्या बाजीरावचे वजन त्यावेळी १७० किलाे हाेते. त्यापूर्वी याच महामार्गावर एका बिबट्याचा तसेच इतर वन्यप्राण्यांनाही वाहनांच्या धडकेमुळे जीव गमवावा लागला तर काहींना जखमी व्हावे लागले.
...
तीन शेतकऱ्यांचा मृत्यू
वाघ व बिबट्यांनी काेंढाळी परिसरात जरी शेतकऱ्यांवर हल्ले चढविले नसले तरी या घटना लगतच्या कारंजा (घाडगे) (जिल्हा वर्धा) तालुक्यात अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. कारंजा (घाडगे) तालुक्यातील धानोली, नांदोरा व आगरगाव शिवारात वाघाने केलेल्या हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाला आहे. या घटनांचा पुनरावृत्ती काेंढाळी परिसरात हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्रह्मपुरी व यवतमाळ भागात ही समस्या आता गंभीर बनली आहे.