निशांत वानखेडे
नागपूर : मानवाची उत्क्रांती आफ्रिकेतच झाली असा दावा मानववंश संशाेधकांद्वारे केला जाताे. साधारणत: ६५ हजार वर्षांपूर्वी मानवी उत्क्रांती झाली असावी, असेही नमूद केले जाते. त्यानंतर या मानवाचे जगभर स्थलांतर झाले, असेही मानले जाते. मग आपल्या भारतात मानवाचे पहिले पाऊल कुठून, कधी पडले हा खरं तर कुतुहलाचा विषय. ते आफ्रिकेतूनच आले, असे ठाम मत संशाेधकांचे असले तरी ते अमेरिका, युराेपातूनही आले असावेत, असा अंदाजही व्यक्त हाेताे. भारतीय संशाेधकांचे या निष्कर्षासाठी संशाेधन चालले आहे.
मानवी प्रजाती निर्माण झाल्यानंतर हाेमाे सॅपियन हे मानवाचे पहिले आधुनिक रूपांतरण हाेय, असे मानले जाते. त्यानंतर या मानवाने जगभर स्थलांतरण केले. तसे ते भारतीय उपखंडातही आले असावेत, असे ठाम मत आहे. आपणही याच हाेमाे सॅपियन्सचे वंशज आहाेत, या मतप्रवाहाला दुजाेरा देण्यासाठी भारतीय मानव्यविज्ञान सर्वेक्षण संस्थेचे संशाेधन चालले आहे. आफ्रिकेत उत्क्रांत झालेल्या मानवाचा इतिहास ६५ हजार वर्षांचा तर अमेरिका, युराेपातील मानवाचा इतिहास १५ ते १६ हजार वर्षांचा मानला जाताे. मात्र मानवाने युराेपपूर्वी भारतात पाऊल ठेवल्याचा विश्वास आहे. असे असले तरी भारतीय मानवाचा कालखंड अद्याप ठामपणे नमूद केला जात नाही. ही कमतरता दूर करण्याचा संशाेधकांचा प्रयत्न आहे.
मानव्यविज्ञान संस्था, नागपूर केंद्राचे सहायक संशाेधक राजकिशाेर महाताे यांनी याबाबत माहिती दिली. हे संशाेधन कसे करायचे, हा अनेकांना प्रश्न पडेल. त्यासाठी देशातील आदिम जमातींवर अभ्यास केला जात आहे. महाताे यांच्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील काेलाम, माडिया गाेंड, कातकरी यांच्यासह छत्तीसगडच्या बैगा, कमार, हिलकाेरबा, एमच्या सहारिया आदी ७५ जमाती अतिशय पुरातन मानल्या जातात. या पुरातन जमातींचे डीएनए सॅम्पल गाेळा करण्यात आले आहेत. या सॅम्पलवर सध्या संशाेधन सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
- भारतातील आदिम जमातींचे डीएनए गाेळा करण्यात आले आहेत.
- या मायटाेकाॅन्ड्रीयल डीएनएचे आफ्रिका व युराेपीय देशातील पुरातन जमातींच्या डीएनएशी मॅच करण्यात येईल.
- ज्या प्रदेशातील आदिमानवाशी अधिक साम्य आढळले, त्या बिंदूवर संशाेधन करण्यात येईल.
- आंतरराष्ट्रीयस्तरावर मान्यतेबाबत वरिष्ठस्तरावर मंथन.