नागपूर :बाळापूरचे शिवसेना आमदार नितीन देशमुख यांनी बुधवारी नागपुरात परतल्यावर सांगितलेली आपबिती आणि केलेल्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर त्यांची विमानातील हसतमुख छायाचित्रे गुरुवारी सोशल मीडियावर आली. त्यामुळे मोठ्या संकटातून आपण निसटलो असे सांगणाऱ्या देशमुखांबद्दलचा संभ्रम या छायाचित्रांनी वाढविला आहे.
आपले अपहरण केले गेले आणि आपण कसेबसे महाराष्ट्रात परतलो, असे देशमुखांनी आल्याआल्या नागपुरात सांंगितले होते. मात्र, देशमुख यांना जबरदस्तीने नेले नसून गुवाहाटीहून चार्टर्ड फ्लाईटने आपणच परत पाठविल्याचे शिंदे गटाने म्हटले आहे. या सोबतच, पुरावा म्हणून विमानातील त्यांची हसतमुख छायाचित्रे सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आली. याबाबत विचारणा करण्यासाठी प्रसारमाध्यमांनी मुंबईत देशमुख यांच्याशी संपर्क साधला, मात्र त्यांनी थेट उत्तर देणे टाळले.
शिंदे यांच्या समर्थकांच्या मते, पत्नी आजारी असल्याने देशमुख यांना बाळापूर (जिल्हा अकोला) येथे परत जायचे होते. त्यामुळे शिंदे यांनी त्यांच्यासाठी गुवाहाटीला चार्टर्ड फ्लाईटची व्यवस्था केली. सोबत आपले दोन विश्वासू समर्थक आमदारासोबत पाठवले. प्रवासादरम्यान एकाने तिघांची मोबाईलवरून छायाचित्र घेतली. तीच गुरुवारी प्रसारमाध्यमांसमोर आली.