नागपूर/अमरावती : कोंढाळी परिसरातील रिंगणाबोंडी, मिनीवाडा, मसाळा, चाकडोह, आंगेवाडा शिवारात काही दिवसांपासून पक्ष्यांच्या अचानक मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. मृत पक्ष्यांमध्ये पाेपट, चिमणी, कावळा व जंगली कबुतरांचा समावेश असून शनिवारी सकाळी रिंगणाबाेडी शिवारातील झाडाखाली मृत पाेपटांचा सडा पडला हाेता. तिकडे अमरावतीच्या बडनेरा भागातही दोन दिवसांत २८ कोंबड्या दगावल्याने भीती निर्माण झाली आहे. पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत मृत कोंबड्यांचे स्वॅब अमरावतीच्या पशुवैद्यकीय प्रयोगशाळेत पाठविल्याची माहिती डॉ. अनिल किटुकले यांनी दिली.
संजय नागपुरे यांचे रिंगणाबाेडी (ता. काटाेल) गावालगत शेत असून त्यांच्या शेतातील झाडाखाली शनिवारी सकाळी माेठ्या प्रमाणात मृत पक्षी आढळून आले. त्यामुळे त्यांनी काेतवाल सचदेव बागडे यांना साेबत घेत रिंगणाबोडी, चाकडोह, हरदोली शिवाराची पाहणी केली असता, त्यांना याही भागात मृत पक्षी आढळून आले. त्यामुळे प्रशासनात खळबळ उडाली. बडनेरा जुन्या वस्तीतील दत्तवाडी परिसरात राहणारे उमेश गुळरांधे, नलिनी फेंडर, गजानन कडव, अजय चोरआमले यांच्याकडील २८ कोंबड्या मृत्युमुखी पडल्या. त्यांना पांढरी शौच झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे.