रामटेक : रामटेक तालुक्यात ब्रिटिशांनी मातीचे खिंडसी धरण बांधले. याला १०८ वर्षांचा कालावधी झाला आहे. पण या प्रकल्पातून मात्र अजूनही शेतीला थेट पाणी मिळत नसल्याने रामटेक तालुक्यातील शेती सिंचनाविना पाेरकी झाली आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळात १९१३ साली ब्रिटिश शासनाने तत्कालीन अभियंता एच. डब्ल्यू. हॅलिफाक्स यांच्या देखरेखीखाली खिंडसी जलाशयाचे काम पूर्ण केले. रामटेकच्या दाेन टेकड्यांचा आधार घेऊन सुर नदीवर जुन्या खिंडसी गावाजवळ हे मातीचे धरण बांधल्या गेले. धरण बांधण्यासाठी असलेल्या उत्कृष्ट जागेकडे तंत्रज्ञाचे लक्ष १८६७-६८ सालापासून वेधले हाेते. परंतु धरणाचे काम सुरू हाेण्यास १९०६ साल उजाडले.
खिंडसी प्रकल्प नागपूर व भंडारा जिल्ह्यासाठी बनविण्यात आला. या भागात धानाच्या पिकाला अपुऱ्या पावसामुळे धाेका निर्माण हाेत हाेता. त्यामुळे हा प्रकल्प तयार करण्यात आला. नागपूर जिल्ह्यातील ७० गावातील ४,४५२ हेक्टर व भंडारा जिल्ह्यातील ४० गावातील ४,४५१ हेक्टर जमिनीला साधारणत: धानाच्या पिकास दाेनदा पाणी मिळावे, अशी अपेक्षा हाेती. ओलित क्षेत्र अजून विकसित व्हावे. जास्त सिंचन करता यावे, यादृष्टीने पेंच प्रकल्पाची आखणी करताना पेंच प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून रामटेक तलावाखालील लाभक्षेत्राला या पाण्याचा लाभ व्हावा, या हेतूने रामटेक जलाशयाचा मुख्य कालवा पेंच प्रकल्पाच्या डाव्या कालव्याशी जाेडला गेला. तेव्हा हा कालवा नाममात्र झाला. पेंच प्रकल्पाचे पाणी सुटले की खिंडसीचे पाणी साेडले जाते.
या तलावाचे पाणलाेट क्षेत्र २१३.०० चाै. किमी आहे. जलमग्न क्षेत्र २११७ हेक्टर आहे. पाण्याचा एकूण साठा १०५.१२ दलघमी आहे. सध्या या धरणाचा ७० गावातील ४४५२ हेक्टर जमिनीला काेणताही पाणीपुरवठा हाेत नाही. हे धरण फक्त पर्यटनापुरते मर्यादित झाले आहे. खिंडसी पूरक कालवा जेव्हा पूर्ण हाेईल तेव्हा हे धरण या भागातील शेतकऱ्यांसाठी निश्चितच सोयीचे ठरेल.