आॅनलाईन लोकमतनागपूर : ओबीसी बांधव बौद्ध धम्माकडे आरक्षणाचे आमीष किंवा ‘ब्रेन वॉशिंग’ केल्यामुळे वळले नाही. आधी बाबासाहेब आणि बुद्ध तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला आणि पटलं म्हणून त्याचा स्वीकार करतो आहोत. बौद्ध धम्माइतके सुस्पष्ट समतावादी तत्त्वज्ञान जगात कुठेही नाही व त्याच मार्गाने आम्हाला जावे लागणार आहे. या परिवर्तनातूनच ओबीसी बांधव धम्माचा स्वीकार करीत आहेत, अशी भावना प्रा. रमेश राठोड यांनी व्यक्त केली.येत्या २५ डिसेंबरला शेकडो ओबीसी बांधव एकाच वेळी नागपूर आणि मुंबईला बौद्ध धम्माची दीक्षा घेणार आहेत. यामध्ये महाराष्ट्रसह मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि आंध्रप्रदेशातील बंजारा, हलबा, मातंग, तेली, माळी, कुणबी, अग्रवाल अशा विविध जातींमधील ओबीसी बांधवांचा समावेश आहे. प्रा. राठोड यांनी नागपुरात दीक्षाभूमीवर होणाऱ्या या दीक्षा समारोहाबाबत पत्रपरिषदेत माहिती दिली. दुपारी १२ वाजता धम्मदीक्षा समारोहापूर्वी संविधान चौकाकडून दीक्षाभूमीकडे धम्मरॅली काढली जाईल. त्यानंतर २ वाजता प्रत्यक्ष दीक्षा सोहळ्याला सुरुवात होणार आहे. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमीचे अध्यक्ष व महाबोधी महाविहार मुक्ती संग्रामाचे धम्मसेनानी भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई व लद्दाखचे भदंत संघसेना हे ओबीसी बांधवांना धम्माची दीक्षा देतील. यावेळी प्रा. जैमिनी कडू, डॉ. रुपाताई बोधी-कुळकर्णी, संतोष भालदार व हरिकिसनदादा हटवार आदी मान्यवर परिवर्तित बौद्धांचे मार्गदर्शन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईत बुद्धभूमी येथे याचवेळी हा सोहळा होणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनीही ओबीसी बांधवांच्या धर्मांतरास पाठिंबा दिल्याचे त्यांनी सांगितले.कीर्तनातून बुद्ध सांगणारे हरिकिसनदादाहरिकिसनदादा हटवार कीर्तनकार व भारुडकार म्हणून प्रसिद्ध होते. वारकरी म्हणून कार्य करताना बुद्धाची ओळख पटली. फुले-शाहू-आंबेडकरांच्या चळवळीत सामील झाले. पुढे त्यावर सखोल अभ्यास करून १९६७ साली संपूर्ण कुटुंबासह बौद्ध धम्माचा स्वीकार केला. तेव्हापासून भारुड कार्यक्रमाच्या माध्यमातून ते बुद्धाचे तत्त्वज्ञान लोकांना सांगत आहेत. अनेक वेळा लोकांनी दगडही मारले. आता मात्र त्यांना माझे सांगणे पटत असल्याचे त्यांनी सांगितले.