कराटेपटू मुलींचा संघर्ष : स्पर्धेसाठी दक्षिण आफ्रिकेचे निमंत्रण, पण पैसा ठरतेय अडचणनागपूर : अनुष्का, अपूर्वा व कोमल या गरीब वस्तीत राहणाऱ्या १२ ते १६ वयोगटातील तीन मुली. एकीचे वडील हातठेल्यावर भाजी विकतात, दुसरीचे वडील इमारतीच्या बांधकामाला जातात तर तिसऱ्या मुलीचे वडील एका कंपनीत राबून दोन वेळच्या अन्नाची जुळवाजुळव करतात. भाकरीची ही लढाई रोज लढल्यामुळे असेल कदाचित या तिन्ही मुलींना लळा लागला तोही कराटेसारख्या धाडसी खेळाचा. या तिघींच्या याच धाडसाची दखल घेऊन दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथील एका आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी त्यांंना निमंत्रण पाठवले आहे. १४ ते १६ आॅक्टोबरदरम्यान ही स्पर्धा तेथे होणार आहे. मनगटाच्या बळावर पदक आणूच, हा त्यांच्या विश्वासही दांडगा आहे. पण, स्वप्नांच्या या भरारीला केवळ दीड लाख रुपयांनी बाधा पोहोचवली आहे. हे दीड लाख जुळविण्यासाठी या मुलींच्या पालकांचा संघर्ष सुरू आहे. रिओ आॅलिम्पिकमध्ये पदक मिळविणाऱ्या खेळाडूंना आॅडी, बीएमडब्लू कार मिळत असताना इकडे नागपुरातील गरीब वस्तीत राहणाऱ्या या तीन मुलींची स्वप्ने अशी अधांतरी लटकली आहेत. यातील अपूर्वा माकडे ही केवळ १२ वर्षांची आहे. विशेष म्हणजे, अपूर्वा ४० टक्के अंध आहे. पण, तिचा खेळ कमालीचा आहे. तिचे वडील त्र्यंबक माकडे हे हातठेल्यावर भाजी विकतात. अपूर्वाची कराटेतील आवड लक्षात घेऊन त्यांनी तिला खेळात पुढे जाण्यासाठी अनेकदा पदरमोड केली. पण, आताचे आव्हान मोठे आहे. त्यांनी हिंमत सोडलेली नाही. तरी अपूर्वाने ही संधी गमावली तर...ही भीती त्यांना अस्वस्थ करीत आहे. अशीच स्थिती चंदननगरात राहणाऱ्या १३ वर्षीय अनुष्का भुंबरचीही आहे. तिचे वडील प्रदीप भुंबर एका कंपनीत काम करतात. अनुष्काने या खेळात आपले नाव मोठे करावे, यासाठी ते सध्या रजा घेऊन नातेवाईक, मित्र-मंडळींकडून पैशांची व्यवस्था करीत आहेत. (प्रतिनिधी)कोमलला प्रायोजकांचा शोधकोमल कठाणे या १६ वर्षीय कराटेपटूचा संघर्ष तर आणखी बिकट आहे. दिघोरीत तिचे छोटेसे घर आहे. तिचे वडील सुरेश कठाणे इमारत बांधकामावर जातात. त्यांना यातले फारसे कळत नाही. त्यामुळे या लढ्याचे नेतृत्व स्वत: कोमलच करीत आहे. कुठल्याही परिस्थितीत ही स्पर्धा गमवायची नाही, या निर्धाराने ती सध्या आपल्या विदेश दौऱ्यासाठी प्रायोजक शोधत आहे. नवी दिल्लीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाऊंडेशनतर्फे या तिन्ही मुलींना प्रवास खर्चात सूट मिळवून देण्यात आली आहे. पण, या गरीब मुलींसाठी अजूनही दीड लाखांचा टप्पा गाठणे म्हणजे मोठेच आव्हान आहे. या तिन्ही मुलींनी याआधी अनेक स्पर्धांमध्ये सुवर्ण, रजत पदके प्राप्त केली आहेत. आताही त्यांना स्वत:च्या क्षमतेवर पूर्ण विश्वास आहे. या विश्वासाला समाजाच्या उदार मनाची जोड मिळाली तर दक्षिण आफ्रिकेत भारताचा तिरंगा अभिमानाने फडकताना दिसेल अन् तो फडकवणाऱ्या गुणवंत मुली आपल्या नागपूरच्या असतील.
स्वप्नांच्या उंच भरारीला दीड लाखांची बाधा!
By admin | Published: September 19, 2016 2:39 AM