नागपूर : अतिक्रमणामुळे इसासनी रोडवर गेल्या दहा वर्षात शेकडो अपघात झाले असून त्यात १२ व्यक्तीना प्राण गमवावे लागले. या रोडचा उपयोग करणाऱ्या नागरिकांची सुरक्षा सतत धोक्यात असते. परिणामी, चार नागरिकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर येत्या २५ ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे.
जितेंद्र मेश्राम, सतीश कान्हेलकर, मंगेश लोखंडे व देवेंद्र दायरे, अशी याचिकाकर्त्यांची नावे आहेत. नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या मंजूर आराखड्यानुसार लोकमान्यनगर मेट्रो स्टेशन ते इसासनी हा रोड १८ मीटर रुंद आहे. या रोडवर महाविद्यालय, रुग्णालय यासह विविध प्रतिष्ठाने आहेत. त्यामुळे रोडवर नेहमीच वर्दळ असते. गेल्या १५ जुलै रोजी रोडचे विकास काम सुरू करण्यात आले. परंतु, अतिक्रमणामुळे १८ ऐवजी केवळ १३ मीटर रुंद रोड बांधला जात आहे. काही ठिकाणी हा रोड ९ मीटरपर्यंत अरुंद करण्यात आला आहे. परिणामी, हा रोड अपघाताला निमंत्रण देत आहे. बरेचदा गंभीर रुग्ण व विद्यार्थी वाहतूक कोंडीमध्ये अडकतात, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.
कोणीच दखल घेतली नाही
मंजुर आराखड्यानुसार रोड बांधला जावा, यासाठी डिगडोह जागृती मंचाच्यावतीने वेळोवळी आंदोलने करण्यात आली. मंचाने केंद्रीय रस्ते वाहतूक विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग व डिगडोह ग्रामपंचायत यांना निवेदने सादर करून अतिक्रमण हटविण्याची मागणी केली. परंतु, कोणीच दखल घेतली नाही. रोडवरील अतिक्रमण ‘जैसे थे’ आहे, असा आरोपही याचिकाकर्त्यांनी केला आहे. याचिकाकर्त्यांतर्फे ॲड. अश्विन इंगोले बाजू मांडणार आहेत.