नागपूर : परराज्यातून पोटापाण्यासाठी नागपुरात आले. रोजगाराचा कसाबसा जम बसल्याने मिळालेल्या चिरोट्यात स्वप्नांचा आशियाना बनविला. पै-पै जमवून वस्तू खरेदी केल्या. दोन पैसे गाठीला जोडले, थोडंथिडकं सोनं जमविले. पण सोमवारी लागलेल्या आगीत आयुष्यभर जमविलेले सर्वच गमविले. महाकालीनगरातील झोपडपट्टीत लागलेल्या आगीने शेकडो कुटुंबांना रस्त्यावर आणले. आगीने होरपळलेल्या संसाराकडे बघून बायाबापड्यांच्या डोळ्यांतील अश्रू थांबता थांबत नव्हते.
हातावर आणणे अन् पाणावर खाणे असेच येथील लोकांचे आयुष्य. सोमवारी सकाळी घरकाम आटोपून वस्तीतील बायामाणसं रोजगारासाठी घराला कुलूप लावून निघून गेले. अशात १० ते १०.१५ वाजताच्या सुमारास अचानक सिलिंडरचा स्फोट झाला. एक एक करता दहा ते बारा सिलिंडर फुटले. अख्ख्या वस्तीला आगीने कवेत घेतले. घराघरांत आगीचे लोट पसरले. घरात असलेले काही जण जिवाच्या भीतीने बाहेर पळत सुटले. बघता बघता आगीने सर्वच उद्ध्वस्त केले. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. पण प्रत्येक कुटुंबीयांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.
घटनेची माहिती मिळताच घराबाहेर पडलेले सर्वच वस्तीत धडकले. अग्निशमन विभागाने आगीवर नियंत्रण मिळविल्यानंतर आपापल्या घराची अवस्था बघून आक्रोश, किंचाळ्या आणि प्रत्येकाच्या डोळ्यांतून अश्रू थांबता थांबत नव्हते. या आगीत घरातील काही तर वाचले असेल, या आशेने शोधाशोध करू लागले. धान्य जळाले, भांडे वितळले, आगीने छतावरील टीन कोसळले. टीव्ही, फ्रीज, कुलर, आलमारी काहीच शाबूत राहिले नाही.
बायकोचं सोनं तरी सापडेल
बांधकामावर मजुरी करणारा शालिकराम पटेलचा आशियानाच आगीत होरपळला. पण हा मोठ्या अपेक्षेेने बायकोने जमा केलेले सोन्याचे दागिने राखेत शोधत बसला होता. वितळलेल्या दागिन्याचा काहीतरी अंश भेटेल या अपेक्षेने अख्खी राख उकरून काढली, पण हाती निराशा आली.
अंगावरचे कपडेच उरले
प्रशासनाने लोकांसाठी अन्न व पाण्याचा स्टॉल लावला होता. दोन प्लेटमध्ये चिमुकल्यांसाठी भात घेऊन हेमिन वर्मा आपल्या घरासमोर मुलांना भरवत बसली होती. घरात सर्वच काही होते, पण आगीत संपूर्ण नष्ट झाले. बस अंगावरचे कपडेच शिल्लक राहिले साहेब. १२ वर्षांत पै-पै जमविलेले क्षणात नष्ट झाले.
दप्तर, पुस्तकं, खेळणीही जळाल्या
सूरज नावाचा मुलगा चवथ्या वर्गात शिकतो. उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्याने तो घरीच होता. या आगीत सूरजचे संपूर्ण घर जळाले. आग विझल्यानंतर सूरज व त्याचा मित्र पुस्तक, दप्तर, खेळणी शोधत होता. नागेश चव्हाणची एक मुलगी कॉलेजात शिकते. नागेश कामावर निघून गेला आणि मुलगी ही कॉलेजात गेली. ते दोघेही परतल्यानंतर घराची धूळधाण झाली होती. घरातील अन्नधान्य, भांडे, टिनाचे छत काहीच शिल्लक नव्हते.
प्रशासनाकडून मदतीची अपेक्षा
श्रावण नागेश्वरचे या आगीत घर आणि नवीन कोरी गाडी जळली. आलमारीत ठेवलेल्या बायकोच्या सोन्याच्या बांगड्या आणि काही रोख आग विझल्यानंतर तो शोधण्यात धडपडत होता. पण सर्वच कोळसा झाले होते. त्याला काहीच गवसले नाही. सहासात वर्षांच्या संसाराची धूळधाण झाल्याने प्रशासनाने मदत करावी, अशी अपेक्षा त्याने व्यक्त केली.
पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी
आगीची माहिती मिळताच पालकमंत्री नितीन राऊत व जिल्हाधिकारी आर. विमला, जि.प. चे माजी अध्यक्ष सुरेश भोयर यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली.
पंपाच्या साहाय्याने विहिरीतील पाण्याचा वापर
आग विझविण्यासाठी परिसरात पाणी उपलब्ध नसल्याने विहिरीवर दोन पंप लावले. पंपाच्या साहाय्याने अग्निशमन गाडीत पाणी भरून आगीवर पाण्याचा मारा केला, तसेच पाण्याच्या टँकरचा वापर करण्यात आला.
..तर अनेकांचे जीव गेले असते!
सकाळी १० नंतर सिलिंडरचा स्फोट झाला आणि एकानंतर एक स्फोट सुरू झाले. वेळीच सगळे सतर्क झाल्याने धावपळ करून एकमेकांचे जीव वाचवले, अन्यथा अनेकांचे जीव गेले असते.