निशांत वानखेडे
नागपूर : दुप्पट उत्पन्न आणि सबसिडीचे प्रलाेभन दाखवून शेतकऱ्यांच्या माथी मारलेल्या शेडनेट, पाॅलिहाऊस याेजनेने विदर्भातील शेकडाे शेतकऱ्यांना देशाेधडीला लावले आहे. विशेष म्हणजे तरुण शेतकऱ्यांनी माेठ्या संख्येने ही याेजना स्वीकारली हाेती; मात्र या याेजनेत लाभ हाेण्याऐवजी शेतकऱ्यांच्या डाेक्यावर बॅंकांच्या कर्जाचा डाेंगर चढला असून, ते भरण्यासाठी त्यांच्यावर घरदार, शेती विकण्याची पाळी आली आहे. यातील काही शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्यासारखे टाेकाचे पाऊल उचलले आहे.
कृषी खात्याच्या याेजनेअंतर्गत शेतात पाॅलिहाऊस, शेडनेट लावणाऱ्या अनेक शेतकऱ्यांनी ‘लाेकमत’शी बाेलताना आपल्या व्यथा मांडल्या.
घाेराड (ता. सेलू, जिल्हा वर्धा) येथील विठ्ठल वानाेडे यांनी सांगितले, २०१४-१५ मध्ये कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी पाॅलिहाऊसचे महत्त्व सांगितले. नाेकरी साेडून घरची अडीच एकर शेती कसायला लागलेले विठ्ठल या याेजनेकडे आकर्षित झाले. त्यांनी ४० लाखांचे कर्ज काढून एका एकरात पाॅलिहाऊस लावून घेतले. यासाठी त्यांनी शासनाच्या याेजनेअंतर्गत पुण्यात जाऊन प्रशिक्षणही घेतले. कृषी अधिकाऱ्यांनी वानाेडे यांना कार्नेशियन व जरबेरा फुले लावण्याचा सल्ला दिला हाेता. त्यांनी पुण्यातील कंपनीकडून प्रती राेप १० रुपये या दराने ५.५० लाख रुपयांची ५२ हजार कार्नेशियन फुलाची राेपे, तर ३३ रुपये प्रती राेप दराने ४.५० लाखांची १२,६०० जरबेरा फुलाची राेपे आणली आणि दाेन्ही फुलांची राेपे एका एकरात पाॅलिहाऊसमध्ये लावली. मात्र दाेनच महिन्यांत एका एकरातील पूर्ण राेपे उष्णतेने जळून गेली. विठ्ठल वानाेडे यांच्या डाेळ्यात अश्रूंशिवाय काहीच उरले नाही. यात हाती काही न लागता डाेक्यावर ५० लाखांचे कर्ज चढले. कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी त्यांनी खासगी बॅंकेकडून १२ लक्ष रुपयांचे कर्ज काढले. सहा वर्षांत सरकारी बॅंकेचे ७२ लाख आणि खासगी मिळून ९० लक्ष रुपये कर्जाचा डाेंगर चढला आहे.
५० टक्क्यांऐवजी २५ टक्केच सबसिडी
शासनाने याेजना देतेवेळी कर्जावर ५० टक्के सबसिडी मिळण्याचे प्रलाेभन दाखविले हाेते; मात्र प्रत्यक्षात सबसिडी मिळाली केवळ २० ते २५ टक्के. ती मिळायलाही अडीच वर्षांचा काळ लाेटला व ताेपर्यंत मूळ कर्जावर व्याजावर व्याज चढले हाेते.
धक्क्याने वडिलांचा मृत्यू
वर्ष उलटताच बॅंकेने कर्ज फेडण्यासाठी तगादा लावणे सुरू केले. बॅंकेचे अधिकारी घरी येऊ लागले. अडीच एकर शेती विकूनही डाेंगराएवढे कर्ज फेडणे शक्य नव्हते. त्यामुळे बॅंकेने वानाेडे यांची गॅरंटी घेतलेल्यांनाही त्रास देणे सुरू केले. कुणाची शेती, कुणाचे घर निलामी काढण्याचे पत्र पाठविण्यात आले. हा सगळा प्रकार हाेताना पाहून धक्क्याने २०१९ मध्ये वडील बापूराव वानाेडे यांचा मृत्यू झाल्याचे विठ्ठल यांनी सांगितले.
जिल्ह्यात १० शेतकऱ्यांच्या आत्महत्या
अनेकदा वानाेडे यांनाही आत्महत्या करण्याचा विचार आला; मात्र एम. ए. शिकलेल्या वानाेडे यांनी आपल्यानंतर कुटुंबाचे हाल हाेतील, या विचाराने आत्महत्येचा विचार साेडून दिला. मात्र याविराेधात लढण्याचा निर्धार केला. त्यांनी वर्धा जिल्ह्यासह विदर्भ व महाराष्ट्रातील पाॅलिहाऊस याेजना स्वीकारलेल्या शेतकऱ्यांची यादी काढली. ही संख्या १२०० च्या घरात आहे. त्यांच्या जिल्ह्यात ११० शेतकऱ्यांनी या याेजनेत कर्ज घेतले हाेते. कुणी १० गुंठ्यांसाठी १२ लाख, कुणी २०, ३०, ५० लाखांपर्यंत कर्ज घेतले आहे. त्या सर्वांवर चढलेल्या कर्जाची यादी त्यांनी ‘लाेकमत’ला दिली आहे. यातील १० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचेही त्यांनी सांगितले.