योगेश पांडे
नागपूर : युक्रेनमधील स्थिती आणखी गंभीर झाली असून, तेथे अडकलेल्या हजारो भारतीयांचा जीव टांगणीला लागला आहे. राजधानी किव्हमध्येदेखील रशियाचे सैन्य शिरले असून, देश सोडून जाण्याच्या भारतीयांच्या अपेक्षांवर पाणी पडले आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे खार्कोव्ह किव्हकडे निघालेले शेकडो विद्यार्थी रस्त्यातच अडकले आहेत. त्यातील अनेकांनी चक्क न्यायव्हकी मेट्रो स्थानक व टनेलमध्ये आश्रय घेतला आहे. मूळचे नागपूरकर व मागील १७ वर्षांपासून युक्रेनमध्ये असलेले एअरोस्पेस वैज्ञानिक राजेश मुनेश्वर हे सातत्याने ‘लोकमत’च्या संपर्कात असून, त्यांनी प्रत्यक्ष वास्तव सांगितले आहे.
रोमानिया व पोलंडच्या सीमा खुल्या झाल्यामुळे अनेक जणांनी खाजगी वाहनांनी तिकडे जाण्याचे ठरविले. भारतीय दूतावासानेदेखील चारशे विद्यार्थ्यांसाठी बसेसची व्यवस्था केली होती. मात्र मार्गावर युक्रेनकडून आवश्यक सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आलेली नाही. शिवाय राजधानीतून बाहेर पडण्याच्या मार्गांवर सातत्याने गोळीबार व बॉम्बहल्ले सुरू आहेत. त्यामुळे भारतीयांनी ते आहेत तेथेच थांबावे, अशी सूचना देण्यात आली आहे. भारतीय दूतावासाकडून विद्यार्थ्यांच्या खाण्यापिण्याची शक्य तेवढी मदत करण्यात येत आहे. खार्कोव्ह येथे अडकलेल्यांपैकी काही विद्यार्थ्यांना तेथील भारतीयांनी राहण्याची जागा दिली आहे. काही जणांची हॉटेल्स व रेस्टॉरेंटस् आहेत. त्यांनी आपल्या आस्थापनांमध्ये विद्यार्थ्यांची व्यवस्था केली आहे. मात्र या विद्यार्थ्यांना व नागरिकांना तेथून लवकरात लवकर बाहेर काढणे अत्यावश्यक आहे, अशी भावना मुनेश्वर यांनी व्यक्त केली.
रात्रभर दहशत, डोळ्यांसमोर रशियाचे रणगाडे
किव्हमध्ये रात्रभर दहशतीचे वातावरण होते व सातत्याने गोळीबार तसेच बॉम्बस्फोटांचे आवाज येत होते. सकाळच्या सुमारास तर किव्हमध्ये रशियाचे रणगाडेदेखील शिरले. खिडकीच्या बाहेर पाहिले असता रशियन सैन्य दिसून येत आहे. त्यांनी स्थानिक नागरिकांवर गोळीबार वगैरे केलेला नाही. प्रत्येक जण शक्य त्या पद्धतीने एकमेकांना आधार देण्याचा प्रयत्न करीत आहे. एकीकडे थंडी आणि दुसरीकडे हल्ल्याची भीती अशा दुहेरी संकटात लोक सापडले आहेत.
आता मिशन हंगेरी, भारतीय तिरंगा लावण्याच्या सूचना
स्लोव्हाकिया, हंगेरीनेदेखील युक्रेनमधून नागरिकांना प्रवेश देण्याची संमती दिली आहे. ज्या भारतीयांना हंगेरीत जायचे आहे, त्यांनी नोंदणी करायची आहे. आम्ही अनेकांची नोंदणी केली आहे. शुक्रवारची रात्र सरली की स्थिती आणखी स्पष्ट होईल. भारतीय नागरिकांना त्यांच्या वाहनांवर भारतीय झेंडा लावण्याची तातडीची सूचना देण्यात आली आहे, अशी माहिती मुनेश्वर यांनी दिली.
किव्हमध्ये स्थानिकांनादेखील शस्त्रवाटप
युक्रेनच्या नागरिकांमध्ये देशाप्रति खूप प्रेम आहे. सैन्याची कमतरता लक्षात घेता किव्हमध्ये सकाळच्या सुमारास सैन्याने स्थानिक नागरिकांनादेखील शस्त्रांचे वाटप केले. त्यात प्रामुख्याने बंदुका व काडतुसे होती.