नागपूर : मसाला पॅकेजिंगचा गृह उद्योग सुरू करून घरबसल्या पाच ते दहा हजार रुपये महिना कमविण्याची ऑफर देत दोन महिलांनी शेकडो महिलांना चुना लावला. श्रद्धा मोझरकर (वय ४२, रा. बुधवारी बाजार) आणि नेहा जुवारे (३२, रा. सोमवारी क्वॉर्टर) अशी आरोपींची नावे आहेत. जाळ्यात अडकलेल्या महिलांकडून रजिस्ट्रेशन फीच्या नावाने लाखो रुपये गोळा केल्यानंतर या दोघी पळून गेल्या.
२३ सप्टेंबर २०२१ ला या दोघींनी घरोघरी फिरून आपला तुळसी गृह उद्योग असल्याचा प्रचार केला. कोरोनाच्या सावटामुळे कामधंदा कमी झाल्याने अनेक महिला घरीच बसून होत्या. आमच्या मसाल्याचे पॅकेजिंग करा अन् घरबसल्या किमान पाच हजार रुपये कमवा, अशी ऑफर मोझरकर आणि जुवारे या दोघींनी वेगवेगळ्या भागातील महिलांना दिली. पॅकेटमध्ये मसालाच भरायचा आहे, असे समजून अनेकींनी ही ऑफर स्वीकारली. त्यानंतर त्या दोघींनी संपर्कात आलेल्या महिलांना ‘जास्तीत जास्त महिलांची आपल्या गृहउद्योगांसाठी गरज असल्याचे सांगून रोजगाराची आवश्यकता असलेल्या ओळखीच्या महिलांशीही संपर्क करा’, असे सांगितले.
अशा प्रकारे एकट्या अजनी भागातील ४०० वर महिला मोझरकर आणि जुवारे या दोघींनी आपल्या जाळ्यात अडकविल्या. त्यांच्याकडून प्रत्येकी ५०० रुपये रजिस्ट्रेशन फी आरोपी महिलांनी घेतली. प्रारंभी १ जानेवारीपासून महिलांना रोजगार देऊ असे सांगणाऱ्या या दोघींनी नंतर वेगवेगळे कारण सांगून संबंधित महिलांना टाळणे सुरू केले. ७ एप्रिलनंतर या दोघींनी गरजू महिलांशी संपर्क तोडला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडित महिलांनी अजनी पोलिसांकडे धाव घेतली. सविता अरविंद शिंदे (वय ५०) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी मोझरकर आणि जुवारे या दोघींविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यांचा शोध घेतला जात आहे.
अनेक जिल्ह्यात नेटवर्क
आरोपी श्रद्धा मोझरकर आणि नेहा जुवारे या दोघींचे वर्धा, अमरावतीसह अनेक जिल्ह्यात नेटवर्क असून, त्यांनी अशाच प्रकारे ठिकठिकाणच्या शेकडो महिलांना गंडा घातल्याची चर्चा आहे.