नागपूर : आपण २००, ३०० किंवा त्यापेक्षा अधिक वर्षे जुनी मंदिरे, राजवाडे पाहताे. त्यांची निर्मिती, बांधकामाची शैली आजही तेवढीच आकर्षक आणि भव्य वाटते. आजच्या काळात इमारती बांधल्या की २५ किंवा जास्तीत जास्त ५० वर्षे टिकतात. मग या प्राचीन वास्तू शेकडाे वर्षानंतरही तेवढ्याच मजबूत आणि देखण्या कशा, हा प्रश्न पडताे. झुलेलाल इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टच्या विद्यार्थ्यांनी नागपुरातील अशा प्राचीन वारसास्थळांच्या वास्तुशैलीचे रहस्य अगदी साेपे करून उलगडले.
जागतिक वारसा दिनाचे औचित्य साधून संस्थेच्या विद्यार्थ्यांनी शहरातील सात निवडक वारसास्थळांचे वेगळ्या रुपात दर्शन घडविले. महाल येथील ऐतिहासिक काशीबाई घाट येथे हे ‘वारसा’ प्रदर्शनाचे आयाेजन करण्यात आले. माजी महापाैर दयाशंकर तिवारी, महाराजा ऑफ नागपूर ट्रस्टचे जयसिंग राजे भाेसले, झुलेलाल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संचालक प्रमाेद पांपटवार व संस्थेच्या प्राचार्या प्रा. अपूर्वा साताेकर यांच्या उपस्थितीत या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी काशीबाई राजघाटासह महालमधील सर्व द्वार, गाेंड राजवटीतील जागृतेश्वर महादेव मंदिर, भाेसलेकालीन मुंशी मंदिर, तेलंगखेडीचे कल्याणेश्वर मंदिर, रुक्मिनी मंदिर आणि सदरचे ऑल सेंट्स ऑफ कॅथेड्रल आदी वारसास्थळांचा अनेक दिवस अभ्यास केला. ते बांधले कसे, त्यासाठी साहित्य काेणते वापरले, कारागीर कुठून आणले, त्यांची रचना कशी हाेती अशा विविध गाेष्टींचे पद्धतशीर डाक्युमेंटेशन केले.
प्राचार्या साताेकर यांनी सांगितले, नागपुरातील सर्व मंदिरे, राजवाडे हेमाडपंथी शैलीने बांधलेली आहेत. भाेसले राजवटीच्या ‘अटक ते कटक’ या ब्रिदवाक्याप्रमाणे नगारा व द्रविडीयन अशा दाेन्ही शैलीची छाप यामध्ये दिसते. याचा अर्थ राजांनी ओडिसा व राजस्थानमधील तज्ज्ञ व कारागिरांना आणून या मंदिरांची, राजवाड्यांची रचना केली आहे. माेठे वालुका दगड, चुन्याचा उपयाेग करून ती बांधलेली असल्याने आजही मजबूत आहेत. त्यांचे काेरीव काम अनाेखे असून मंदिराची रचना मानवी शरीराच्या रचनेप्रमाणे केल्याचे दिसून येते. या वारशांच्या संवर्धनाबाबत जागृती करण्यासाठी हे आयाेजन असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. संस्थेचे विद्यार्थी व शिक्षकांच्या परिश्रमाचे त्यांनी काैतुक केले.