वाघाच्या बछड्याचा मृत्यू : आदर्श शवविच्छेदन नियमांचा उडविला फज्जाअभय लांजेवार/शरद मिरे - उमरेडतालुक्यातील उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यामधील कम्पार्टमेंट क्रमांक १४१८ मधील ठाणा तलाव परिसरात वाघाचा बछडा (मादी) मृतावस्थेत आढळून आला. हा बछडा भूकबळी ठरला की आणखी कुणाच्या षङ्यंत्राचा बळी ठरला, असा संभ्रम निर्माण झाला आहे. प्रत्यक्षदर्शी व छायाचित्रावरून सदर बछड्याची उंची आणि रुंदीचे मोजमाप करताना काही गफलत तर झाली नाही ना, असाही सवाल आता विचारला जात आहे. या बछड्याची उंची ३३ सें.मी. असल्याचे पत्रकारांना सांगण्यात आले. उंचीचे मोजमाप पाठीच्या मध्यभागापासून ते समोरील पायाच्या पंजापर्यंत करण्यात येत असते. लांबी ८२ सें.मी. सांगण्यात आली. लांबीचे मोजमाप करताना नाकाच्या शेंड्यापासून ते शेपटीच्या टोकापर्यंत असते. परंतु प्रत्यक्षात शव बघितल्यानंतर उंची आणि लांबीच्या मोजमापात अनवधानाने चूक झाल्याची शंका व्यक्त होत आहे. शिवाय, सदर बछड्याचे शरीर फुगल्यासारखे दिसून येत होते. अशक्त असणारा बछडा फुगला कसा. कुणी विषप्रयोग तर केला नाही ना, आदी प्रश्नांची उत्तरे आता शवविच्छेदन अहवालानंतरच सुटणार आहेत. बछड्याच्या भूकबळीचा जबाबदार कोण असा सवाल विचारला जात असून, बेजबाबदार अधिकाऱ्यांच्या हकालपट्टीची मागणी जोर धरत आहे. येत्या हिवाळी अधिवेशनात भूकबळीने मृत्युमुखी ठरलेल्या या बछड्याचा गंभीर प्रकार मांडावा, अशी मागणीही वन्यप्रेमींची आहे. या बछड्याचे वय १४ महिने असल्याचे सांगण्यात आले. वास्तवात त्याचे आकारमान लक्षात घेता वय यापेक्षा अधिक असावे, अशी शक्यता काहींनी व्यक्त केली आहे. आदर्श नियमावलीची पायमल्लीराष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणची शवविच्छेदनासाठी आदर्श नियमावली आहे. या नियमावलीनुसार वन विभागाच्या अखत्यारित कर्तव्य बजावणाऱ्या एका पशुवैद्यकीय अधिकाऱ्यासमवेत अन्य तीन पशुवैद्यकीय डॉक्टरांची चमू असे एकूण चार डॉक्टर शवविच्छेदनासाठी असावेत, अशी तरतूद आहे. या चार डॉक्टरांपैकी अन्य तीन डॉक्टर हे स्थानिक असावेत, असाही नियम आहे. परंतु कम्पार्टमेंट क्रमांक १४१८ येथे मृतावस्थेत आढळून आलेल्या बछड्याचे शवविच्छेदन करताना नागपूर येथील पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून डेप्युटेशनवर असलेल्या डॉ. चित्रा राऊत या हजर होत्या. त्यांच्यासमवेत पशुवैद्यकीय सहायक आयुक्त डॉ. निरगुळकर (उमरेड), डॉ. एल. ए. खान (मांढळ) या केवळ दोनच डॉक्टरांचा सहभाग होता.चार डॉक्टरांची चमू नसेल तर शवविच्छेदन करता येत नाही. ती ‘बॉडी डीप फ्रिजर’मध्ये ठेवावी लागते. शवविच्छेदन नियमात बसत नसताना घाईगर्दीत का उरकवण्यात आले, शिवाय, स्थानिक डॉक्टरांना प्राधान्य का दिले नाही, आदी प्रश्न या गंभीर प्रकारामुळे उद्भवले आहेत. शवविच्छेदनाच्या ‘गाईडलाईन’नुसार प्रक्रिया न झाल्याने राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरण शवविच्छेनासाठी असलेल्या आदर्श नियमावलीचा फज्जाच उडविण्यात आल्याचा आरोप होत आहे. याबाबत डॉ. चित्रा राऊत यांच्याशी चर्चा केली असता, त्यांनी याविषयी अधिक बोलण्याचे टाळले.
भूकबळी की कुणाचे षङ्यंत्र?
By admin | Published: October 29, 2014 12:42 AM