लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लॉकडाऊनमुळे रेल्वेगाड्या अडीच महिन्यापासून ठप्प आहेत. १ जूनपासून रेल्वे प्रशासनाने २०० रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार १४ रेल्वेगाड्या रेल्वेस्थानकावर येत आहेत. परंतु कोरोनाच्या भीतीने प्रवासी कुलींना आपले सामान उचलण्यासाठी देत नसल्याची स्थिती आहे. १० तास काम करूनही एका कुलीच्या पदरात १०० ते १५० रुपये पडत असून एवढ्या तुटपुंज्या कमाईवर कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा भागवावा, असा प्रश्न रेल्वेस्थानकावरील कुलींना पडला आहे. तर प्री-पेड ऑटो बूथ बंद असल्यामुळे रेल्वेस्थानकावरील ऑटोचालकांवरही उपासमारीची वेळ आली आहे.लॉकडाऊनपूर्वी नागपूर रेल्वेस्थानकावर एकूण १४६ कुली कार्यरत होते. दोन महिने रेल्वेतील काही सामाजिक संस्थांनी कुलींच्या रेशनची व्यवस्था केल्यामुळे लॉकडाऊनच्या काळात कसाबसा त्यांना जगण्यासाठी आधार झाला. परंतु १ जूनपासून रेल्वे मंत्रालयाने २०० रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार १४ रेल्वेगाड्या नागपूरमार्गे धावत आहेत. सध्या रेल्वेस्थानकावर सकाळी ८ ते सायंकाळी ६ पर्यंत १२ कुली आणि सायंकाळी ६ ते सकाळी ८ पर्यंत १२ कुली काम करीत आहेत. मोजक्याच रेल्वेगाड्या रेल्वेस्थानकावर येत असल्यामुळे आणि त्यातही कोरोनाच्या भीतीमुळे प्रवासी कुलींना काम देण्यास टाळाटाळ करीत असल्यामुळे कुलींसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे. तर तीन महिन्यांपासून रेल्वेस्थानकावरील प्री-पेड ऑटो बूथ बंद असल्यामुळे ऑटोचालकांचा रोजगारही बुडाला आहे. त्यामुळे त्वरित प्री-पेड ऑटो बूथ सुरू करावेत, अशी मागणी ऑटोचालकांनी केली आहे.
संकटकाळात कुलींना मदत करावी‘रेल्वेस्थानकावर मोजक्याच रेल्वेगाड्या येत आहेत. कोरोनाच्या भीतीमुळे प्रवासी कुलींना काम देण्यास टाळत आहेत. अशास्थितीत कुलींपुढे उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे अशा संकटकाळात रेल्वे मंत्रालयाने कुलींना मानधन देऊन त्यांना जगण्यासाठी आधार देण्याची गरज आहे.’अब्दुल माजीद शेख, अध्यक्ष, रेल्वे कुली कल्याणकारी संस्थाप्री-पेड ऑटो बूथ त्वरित सुरू करा‘लॉकडाऊनच्या काळात रेल्वेस्थानकावरील प्री-पेड ऑटो बूथवरील ऑटोचालकांचा रोजगार बुडाला. कसाबसा त्यांनी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह केला. परंतु आता त्यांना जगणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे त्वरित रेल्वेस्थानकावरील प्री-पेड ऑटो बूथ सुरू करून ऑटोचालकांना दिलासा देण्याची गरज आहे.’अल्ताफ अन्सारी, संचालक, लोकसेवा प्री-पेड ऑटो बूथ