लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सध्या एक पोस्ट खूप व्हायरल होत आहे. प्रसिद्ध उद्योजक आशुतोष शेवाळकर यांची ती पोस्ट अतिशय भावुक तर आहेच; सोबत जाणिवा जागृत करण्यासाठी चिंतनाची जोड त्यात आहे. म्हणायला हा मराठी-हिंदी चित्रपटातील एक प्रसंग वाटावा. कोरोनाकाळात असे अनेक सीन्स देशभरातला माणूस याची देही याची डोळा पाहतो आहे आणि विदारक परिस्थितीचे दर्शन घेत आहे. भुकेचा अंत भिकेने नाही तर भुकेने आखडणाऱ्या पोटातील वेदनेच्या जाणिवेने होतो. शासनाने त्या जाणीव मजबूत करणे अपेक्षित आहे आणि कदाचित हाच हेतू या पोस्टचा आहे.
४५ वर्षे रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारा रिक्षावाला, आज अचानक हाताची ओंजळी पुढे का करतो? अनेक स्वाभिमानी मजूर, कष्टकऱ्यांची व दररोज हातावर पोट असणाऱ्यांची हीच स्थिती आहे. गेल्या महिन्याभरापासून रस्त्यावर कोणी भटकंतीसाठी उतरला नाही आणि त्यामुळे, रिक्षात बसणार कोण? रिक्षात बसणार नाही; तर पैसा मिळणार कसा आणि पैसा नसेल तर घरातील चूल पेटणार कशी आणि चूल पेटणार नाही तर मग जगायचे कसे? असे प्रश्न यातून निर्माण झाले.
दीक्षाभूमीसमोरील चित्रकला महाविद्यालयापुढे एक रिक्षावाला हाताची ओंजळ पुढे करून अनवानी उभा होता. किंतु-परंतुचा विचार करीत असतानाच शेवाळकर रिक्षावाल्याकडे गेले आणि त्याच्यापुढे एक नोट, दोन नोट काढते झाले. तिसरीही काढायची तर मदतीसाठी घरी बोलावून घेण्याचा निर्णय झाला. एक कारवाला श्रीमंत माणूस हा पुढाकार घेतो तर सोबतीला इतर कारवालेही थांबायला लागले. दुसऱ्या एकाने चप्पल देतो, दुकानात येऊन जा, असे म्हटले तेव्हा स्वत:च्या पायातील जोडा देण्याची तयारी झाली. मात्र, पाय पोळले असल्याने घालता येणार नाही, हे रिक्षावाल्याने स्पष्ट केले. विशेष म्हणजे, तो रिक्षावाला भुकेच्या माराने व कुटुंबाच्या जबाबदारीने आणि इतर सर्व कारवाले कोरोनाच्या माराने पिळलेले होते. कुणाचा धंदा बसला, कुणाचे आप्त हॉस्पिटलमध्ये तर कुणी बिल भरण्यासाठी प्रयत्नरत अशा आशयातले. असा हा सारा गहिवरून टाकणारा पट डोळ्यांत अंजन घालणारा आणि सणकन चपराक मारणारा आहे. हीच स्थिती शहरातील, राज्यातील आणि देशातील अनेकांची आहे आणि अशा वेळी शासकीय मदत केवळ घोषणेपुरतीच का ठरावी? मदतीच्या अपेक्षेत असलेले आपला सारा स्वाभिमान हरवून बसतील तेव्हा ती मदत भिकेला लागलेल्या भिकाऱ्यासाठी असेल, भारताच्या नागरिकासाठी नाही, हीच भावना यातून स्पष्ट होते.