लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रनिंग स्टाफच्या विविध मागण्यांसाठी सेंट्रल रेल्वे मजदूर संघाने डीआरएम कार्यालयासमोर एक दिवसीय उपोषण आंदोलन केले. आंदोलनात सहभागी लोकोपायलटने उपाशीपोटी रेल्वेगाड्या चालवून आपल्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले.लोकोपायलट, गार्डच्या विविध मागण्यांसाठी सेंट्रल रेल्वे मजदूर संघाने मध्य रेल्वेच्या भुसावळ, पुणे, मुंबई, नागपूर, सोलापूर विभागात उपोषण आंदोलन केले. नागपुरात आयोजित आंदोलनात लोकोपाटलट, गार्डचा किलोमीटरनुसार भत्ता ठरवावा, सहायक लोकोपायलट, शंटींग लोकोपायलट, गुड्स गार्डला अतिरिक्त भत्ता द्यावा, लोको पायलट, मेल आणि सहायक लोकोपायलटचे वेतन अपग्रेड करावे, विना गार्डच्या मालगाड्या चालविणे बंद करावे, रनिंग कॅडरमधील रिक्त पदे त्वरित भरावीत, रनिंग स्टाफकडून अतिरिक्त काम करणे बंद करावे, ईटारसी गार्ड रनिंग रुममध्ये सुधारणा करावी, सेवानिवृत्त गार्डकडून मेल आणि गुड्स गाड्यांचे संचालन करू नये आदी मागण्या करण्यात आल्या. आंदोलनात सहभागी लोको पायलट, असिस्टंट लोकोपायलटने उपाशीपोटी राहून रेल्वेगाड्या चालविल्या. यावेळी सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे मुख्यालयाचे कार्यकारी अध्यक्ष देबाशीष भट्टाचार्य, विभागीय अध्यक्ष वीरेंद्र सिंह, सचिव बंडु रंधई, शाखा अध्यक्ष पी. एन. तांती, जी. बी. नायर, सुनील कटियार, के. पी. सिंग, मनोहर आगुटले, अनुराग कुमार, परतोष कुमार, देवेंद्र सिंग, बी. एस. ताकसांडे, एन. आर. पांडे, संतोष तिवारी, ई. व्ही. राव, दुर्गा सिंग, अभिजित कंधवा, प्रमिला राठोड यांच्यासह सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे पदाधिकारी, लोकोपायलट, सहायक लोकोपायलट, गार्ड मोठ्या संख्येने उपस्थित होते.