नागपूर : शहरात कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत राहावी, यासाठी पोलीस आयुक्तांनी जमावबंदीचा आदेश लागू केला आहे. तर, दुसरीकडे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीसाठी परवानगी नसताना शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे.
सोयाबीन-कापूस उत्पादकांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्यभर मोठे आंदोलन सुरू करण्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली. यानंतर तुपकर यांनी १७ नोव्हेंबरपासून संविधान चौकात बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे. सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा, यावर्षी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी, पीक विमा कंपन्यांची अरेरावी थांबावी, सोयाबीन आणि कापूस पिकाला योग्य भाव मिळावा अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन केले जात आहे.
नागपूरात १४४ लागू असल्यामुळे तुपकर यांच्या सभेला परवानगी नाकारण्यात आली. तरीही तुपकर जमावबंदीचा आदेश झुगारून अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली आहे. त्यामुळे पोलिसांनी त्यांनाही नोटीस बजावली आहे. संचारबंदी असल्याने आंदोलन करू नका, असे पोलिसांनी त्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. कापूस आणि सोयाबीनला योग्य भाव मिळावा, अशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी आहे. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. मराठवाडा तसेच विदर्भात गावोगावी प्रभारफेरी काढणार असल्याचा मानस संघटनेने व्यक्त केला आहे.
दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आजपासून विदर्भ दौऱ्यावर आहेत. त्यांच्या दौऱ्याची सुरुवात नागपूरातून होत असून आज साडेपाच वाजता वर्धमान नगर येथील सात वचन लॉन येथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्यावर स्वाभिमानी तुपकर यांनी तीव्र शब्दात रोष व्यक्त करत केला असून मोठ्या नेत्यांच्या सभेला परवानगी मिळते, मात्र आम्हाला नाही, असा सवाल उपस्थित केला आहे.