लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लढाऊ विमान कसे असते, याची नागरिकांना उत्सुकता असते. नागरिकांची ही उत्सुकता दूर करण्यासाठी वायुसेनेने हंटर हे लढाऊ विमान नागरिकांना पाहण्यासाठी अंबाझरी उद्यानात उपलब्ध करून दिले. परंतु योग्य देखभालीअभावी या विमानाची दुरवस्था झाली असून, या विमानाच्या देखभालीकडे लक्ष पुरविण्याची मागणी होत आहे.अंबाझरी उद्यानात १७ डिसेंबर २००१ रोजी वायुसेनेतील हंटर या लढाऊ विमानाची स्थापना करण्यात आली. यावेळी आयोजित समारंभाला एअर चीफ मार्शल ए. वाय. टिपणीस, तत्कालीन महापौर पुष्पा घोडे, आमदार देवेंद्र फडणवीस, उपमहापौर डॉ. रवींद्र भोयर, स्थायी समितीचे अध्यक्ष अशोक गोयल, सत्तापक्ष नेता प्रमोद पेंडके, विरोधी पक्षनेता शेखर सावरबांधे, महापालिका आयुक्त डॉ. टी. चंद्रशेखर यांची प्रमुख उपस्थिती होती. नागरिकांना लढाऊ विमान पाहण्यास उपलब्ध व्हावे, यासाठी वायुसेनेने हे विमान उपलब्ध करून दिले. परंतु सद्यस्थितीत या विमानाची वाईट अवस्था झाली आहे. ज्या ओट्यावर हे विमान ठेवले तो ओटा अस्वच्छ असल्याचे आढळले. विमानाला काही ठिकाणी भेगा पडल्या, रंग उडालेला असून अनेक ठिकाणी बुरशी लागल्याचे दृष्टीस पडले. याशिवाय या विमानाच्या मागील बाजूस झाडे पडल्यामुळे मागचा भाग दिसेनासा झाला आहे. महापालिकेतर्फे विविध ठिकाणच्या सौंदर्यीकरणासाठी लाखो रुपये खर्च करण्यात येतात. पण आपल्याच उद्यानातील विमानाच्या देखभालीसाठी दुर्लक्ष का करण्यात येत आहे, असा सवाल वायुसेनेतील निवृत्त स्क्वॉड्रन लीडर (मेडिकल सायन्सेस) डॉ. रवी वानखेडे यांनी उपस्थित करून, या विमानाची योग्यरीत्या देखभाल करण्याची मागणी केली आहे.