ठळक मुद्देलोकमतचा प्रभाव५४८ विद्यार्थ्यांवर कारवाई४२२ विना हेल्मेट, ६१ ट्रिपल सीट६५ अल्पवयीन विद्यार्थ्यांचे फाडले चालान
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वाहतुकीचे नियम पाळत दुचाकीस्वाराने वाहन चालविताना हेल्मेट वापरणे बंधनकारक आहे. मात्र महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना या नियमांचा विसर पडला आहे.‘लोकमत’च्या ‘आॅन द स्पॉट’मध्ये ७५ टक्के विद्यार्थी विना हेल्मेट, ट्रिपल सीट व दुचाकी चालविताना मोबाईल व हेडफोनचा वापर करताना आढळून आले. या वृत्ताने शहरात खळबळ उडाली. वाहतूक पोलीस उपायुक्त (वाहतूक) राज तिलक रौशन यांनी याची गंभीर दखल घेत विद्यार्थ्यांच्या ट्रिपल सीट व विना हेल्मेटविरोधात विशेष मोहीम हाती घेण्याचे निर्देश दिले. त्यानुसार विविध महाविद्यालयांच्या प्रवेशद्वारासमोरच सकाळी ७ वाजतापासून कारवाईला सुरुवात झाली. यात तब्बल ५४८ विद्यार्थी दोषी आढळून आले. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येत विद्यार्थ्यांवर कारवाई झाल्याचे बोलले जात आहे.दुचाकीवर स्वार होऊन तीन विद्यार्थिनी भरधाव वेगाने महाविद्यालयात जात असताना ‘मेट्रो’च्या ‘क्रेन’वर आदळल्याने जागीच त्यांचा मृत्यू झाला. समाजात याबाबत हळहळ व्यक्त झाली. महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आपल्या ‘सोशल मीडिया’वर याबाबत ‘स्टेटस’देखील ठेवले. मात्र वास्तवात या घटनेपासून विद्यार्थ्यांनी काही बोध घेतला का, याची चाचपणी ‘लोकमत’ने ‘आॅन द स्पॉट’मधून शहरातील विविध महाविद्यालयांच्या परिसरात भेट देऊन केली. समोर आलेले वास्तव हादरविणारे होते. तरुणाईच्या अतिउत्साहावर स्वार होऊन भरधाव वेगाने दुचाकी दामटणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी अक्षरश: मृत्यूशीच स्पर्धा करीत आहेत की काय, असा प्रश्न उत्पन्न झाला. अर्ध्याहून अधिक विद्यार्थी वाहतुकींचे साधे नियम पाळत नसल्याचे दुर्दैवी चित्र होते. आश्चर्य म्हणजे गर्दीच्या रस्त्यांवर ‘ट्रिपल सीट’ जाणाऱ्यांचे प्रमाण तर जास्त प्रमाणात दिसून आले. आपली एक चूक स्वत:सोबतच कुटुंबीयांच्या स्वप्नांची एका क्षणात राखरांगोळी करू शकते, याची जाणीवदेखील विद्यार्थ्यांना नसल्याचे सामोर आले. ‘लोकमत’ने २१ आॅगस्टच्या अंकात ‘ट्रिपल सीट, जीवाहून प्यारी’ या शीर्षकाखाली वृत्त प्रसिद्ध करताच खळबळ उडाली. शहरातील अनेक मोठ्या महाविद्यालय प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली. जे विद्यार्थी विना हेल्मेट व ट्रिपल सीट येतील त्यांना प्रवेश दिला जाणार नसल्याच्या सूचना काढल्या. वाहतूक पोलीस उपायुक्तांनीही याची गंभीर दखल घेत गुरुवारी सकाळी ७ वाजेपासून विविध महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरच कारवाईचे निर्देश पाच वाहतूक झोनला दिले. त्यानुसार ५४८ विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली. यात ४२२ विना हेल्मेट , ६१ ट्रिपल सीट, ६५ अल्पवयीन विद्यार्थ्यांचा समावेश होता.