नागपूर : सिग्नलवर उभे राहून जबरदस्तीने पैसेवसुली करणाऱ्या तसेच लग्नसमारंभात जाऊन उपद्रव करत अक्षरशः खंडणी मागणाऱ्या तृतीयपंथीयांवर अखेर पोलिसांनी कारवाईचा हंटर उगारला आहे. सीताबर्डी व गिट्टीखदान पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी अशा तृतीयपंथीयांवर कारवाई करत १० जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गेल्या काही कालावधीतील तृतीयपंथीयांविरोधातील ही मोठी कारवाई आहे. या कारवाईमुळे तृतीयपंथीयांमध्ये खळबळ उडाली असून, या आरोपींना तडीपार करण्यात येणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
लोकांकडून जबरदस्तीने पैसे वसूल करणाऱ्या तृतीयपंथीयांवर कठोर कारवाईचे संकेत पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले होते. तसेच त्यांनी असे करताना कुणी आढळल्यास तडीपार करण्याचा इशारादेखील दिला होता. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला सोशल माध्यमांतून अलंकार टॉकीज शहरातील वाहतूक सिग्नलवर तृतीयपंथी जबरदस्तीने पैसे मागत असल्याची बाब लक्षात आली.
पोलिसांनी लगेच चौकशी केली व आकांक्षा, मुस्कान, श्वेता, वैशाली, अम्मू हे तृतीयपंथी त्यात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. हे सर्व तृतीयपंथी भांडेवाडी रेल्वेस्थानकाजवळील अंबेनगर येथील रहिवासी आहेत. पोलिसांच्या पथकाने त्या परिसरात जाऊन शोध घेतला असता आकांक्षा, मुस्कान, श्वेता हे सापडले व पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. पाचही तृतीयपंथीयांविरोधात सीताबर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक शुभांगी वानखेडे, संतोष जाधव, भूषण झाडे, राशीद शेख, समीर शेख, अश्विन, पूनम शेंडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
लग्नघरी जाऊन उपद्रव
दरम्यान, १५ फेब्रुवारी रोजी गिट्टीखदान पोलिस ठाण्यांतर्गत एका लग्नघरीदेखील तृतीयपंथीयांनी उपद्रव केला. नर्मदा कॉलनी येथील प्रशांत पाटील यांच्या घरी लग्न समारंभ असताना सोनू, छोटी, जान्हवी, डिंपल, परी हे पाच तृतीयपंथी तेथे पोहोचले व पैशांची मागणी करू लागले. घरातील प्रसंग लक्षात घेता त्यांना एक हजार रुपये देण्यात आले. मात्र, तरीदेखील ते परत जायला तयार नव्हते व त्यांनी ११ हजार रुपयांची मागणी केली. पैसे दिले नाही तर असभ्य वर्तन करण्याची धमकी दिली. यजमानांचे मित्र शशांक गट्टेवार यांनी गिट्टीखदान पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी पाचही आरोपींविरोधात गुन्हा नोंदविला असून, त्यांचा शोध सुरू आहे.
घाबरू नका, तक्रार करा
तृतीयपंथी विविध माध्यमांतून जनतेला त्रास देताना दिसून येतात. जर पैसे दिले नाही तर घाणेरडे अंगविक्षेप करत समोरच्यावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्नदेखील करतात. त्यांना न घाबरता थेट पोलिसांत तक्रार करण्याचे आवाहन पोलिस विभागाकडून करण्यात आले आहे.
इतर पोलिस ठाणे सुस्त का?
शहरातील इतरही पोलिस ठाण्यांच्या हद्दीत तृतीयपंथी सक्रिय आहेत. सध्या लग्नसमारंभ सुरू असून, तेथेदेखील जाऊन ते त्रास देत असल्याचे दिसून येते. मात्र, त्यांच्याविरोधात कारवाईसाठी संबंधित पोलिस ठाण्यांतून पुढाकार घेण्यात आलेला नाही.