लाेकमत न्यूज नेटवर्क
बेला : घाेरपडीची शिकार करून ती ६०० रुपयात विकल्या प्रकरणी बुटीबाेरी (ता. नागपूर ग्रामीण) वनपरिक्षेत्र कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी चार जणांना अटक केली. न्यायालयाने या चारही आराेपींना तीन दिवसांची वन काेठडी सुनावली आहे.
अटक करण्यात आलेल्या आराेपी शिकाऱ्यांमध्ये ईश्वर किसन दुर्गे, विलास मनाेहर बावणे, प्रकाश सूर्यभान बावणे व सुरेश हिरामण भुसारी या चाैघांचा समावेश आहे. ईश्वर, विलास व प्रकाश या तिघांनी बेला (ता. उमरेड) नजीकच्या काेहळा (ता. उमरेड) शिवारात साेमवारी (दि. १९) घाेरपडीची शिकार केल्याची माहिती वन कर्मचाऱ्यांना मिळाली हाेती. त्यामुळे त्यांनी सायंकाळी या तिघांनाही ताब्यात घेत चाैकशी केली. त्यांनी गुन्ह्याची कबुली देत मृत घाेरपड सुरेशला विकल्याची माहिती दिली.
परिणामी, त्यांनी भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ चे कलम ९, ३९, ४९ (ख), ५१, भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम २६, ४१, ५१, ६५ अन्वये गुन्हा नाेंदवून चाैघांनाही अटक केली आणि मंगळवारी (दि. २०) सकाळी उमरेड येथील प्रथम श्रेणी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने चारही आराेपींना गुरुवार (दि. २२)पर्यंत वन काेठडी सुनावली आहे. ही कारवाई उपवन संरक्षक भरतसिंग हाडा, सहायक वनसंरक्षक एन. जी. चांदेवर यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी एल. व्ही. ठाेकळ, क्षेत्र सहायक ए. व्ही. जनवार, वनरक्षक डी. आर. डाेंगरे, जी. जी. जाधव, एस. के.कुलरकर, एस. डी. धुर्वे, ए. बी. कापगते, एम. घाेरपडे यांच्या पथकाने केली.