निशांत वानखेडे
नागपूर : माेरपंखांची विक्री सध्या जाेरात सुरू असल्याचे चित्र असून शहरात, गावाेगावी माेरपंख विक्रेत्यांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे. मागणी असल्याने हवा तसा पुरवठा करण्यासाठी अवैध मार्गाचा अवलंब केला जाण्याचे प्रकार घडतातच. हा प्रकार राष्ट्रीय पक्षी माेराबाबतही हाेत असून, चक्क पाणवठ्यात युरिया टाकून माेरांना मारून नंतर पंख काढण्यात येत असल्याची खात्रीलायक माहिती आहे. विदर्भात अशा प्रकाराची नाेंद नसली तरी मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थानसारख्या भागात हा प्रकार सर्रास हाेत असल्याचे सांगितले जात आहे.
राष्ट्रीय पक्षी म्हणून गणना असलेल्या माेराला धार्मिक महत्त्वही आहे. घरासमाेर माेरपंख लावले तर सुखसमृद्धी येते, अशी मान्यता आहे. धार्मिक कार्यातही माेरपंखांचा वापर हाेताे. फॅशन म्हणूनही मागणी आहे आणि लहान मुलांनाही आकर्षण असतेच. मागणीमुळे विक्रीचे प्रमाण वाढले आहे. पर्यावरण कार्यकर्त्यांच्या निरीक्षणानुसार, नागपूर शहरात ५० पेक्षा अधिक माेरपंख विक्रेते फिरताना दिसतात. सध्या त्यांचा ठिय्या काॅटन मार्केटच्या खवा मार्केटजवळील गेस्ट हाऊसमध्ये असल्याचे बाेलले जाते. त्यांच्याशी सहज चर्चा केली तेव्हा धक्कादायक माहिती पुढे आली. या विक्रेत्यांना ६,००० रुपये महिना पगार व राहण्याखाण्याची व्यवस्था त्या त्या ठिकाणी करून दिली जाते. ही माणसे मग रस्ताेरस्ती फिरून माेरपंख विकतात. हा एक संघटित गुन्हा आहे. मात्र कायद्यातील सवलतीमुळे वन विभाग व पाेलीस यंत्रणाद्वारे दुर्लक्ष केले जात आहे.
आग्रा हे केंद्र
पर्यावरणप्रेमी श्रीकांत देशपांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, हरियाणा, झारखंड या भागात माेरांची संख्या सर्वाधिक आहे. आपल्या देशात माेरपंख विक्रीवर बंदी नाही. मात्र एवढ्या माेठ्या प्रमाणात माेरपंख येतात कुठून, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. मागणीनुसार पुरवठा करण्यासाठी क्रूर मार्गाचा अवलंब केला जाताे. उन्हाळ्यात जंगलाबाहेरच्या पाणवठ्यात युरिया टाकला जाताे. इतर प्राणी, पक्ष्यांवरही त्याचे दुष्परिणाम हाेतात. मृत माेरांचे पंख व अवयव काढून ते आणले जातात. त्यांचे आभूषणही बनतात. आग्रा हे माेरपंख व आभूषण विक्रीचे माेठे केंद्र आहे. त्यानंतर व्यापारी पगारी माणसे ठेवून देशभर विक्रीसाठी पाठवितात.
बंदी नितांत गरजेची
श्रीकांत देशपांडे यांच्या मते, कायद्यात असलेल्या सवलतीचा फायदा घेऊन राष्ट्रीय पक्ष्याची शिकार केली जात आहे. त्यामुळे माेरपंख विक्रीवर ताबडताेब निर्बंध आणणे गरजेचे आहे किंवा केवळ खादी ग्रामाेद्याेगसारख्या ठिकाणाहून विक्री बंधनकारक करावी. त्यामुळे विक्रीवर मर्यादा येईल व शिकारही कमी हाेईल. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि न्यायालयाने याची गंभीर दखल घ्यावी, अशी अपेक्षा देशपांडे यांनी व्यक्त केली.
विक्रेत्यांची नाेंद ठेवणे आवश्यक
मानद वन्यजीव रक्षक प्रफुल्ल भांबाेरकर यांच्या मते, राज्याची सीमा ओलांडून महाराष्ट्रात माेरपंख विक्रीला येणाऱ्यांचा कुठलाही रेकाॅर्ड नसताे. त्यामुळे हा प्रकार सर्रास सुरू आहे. किमान सीमेवर आधारकार्डसह या विक्रेत्यांची नाेंद घेणे आवश्यक आहे. शिवाय वन विभागाकडून माेरपंखांचे स्रोत कुठे आहेत, याचा तपास करणे गरजेचे आहे. शिवाय देशात माेरांची गणना हाेण्याचीही नितांत गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.