राकेश घानोडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लैंगिक अत्याचारामुळे बालकांच्या मनावर होणारी जखम आयुष्यभर भरून निघत नाही,अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती विनय देशपांडे यांनी बालकांवरील लैंगिक अत्याचारांच्या घटनांचे गांभीर्य स्पष्ट केले.गडचिरोली जिल्ह्यातील एका चिमुकलीवरील अत्याचार प्रकरणामध्ये नुकत्याच दिलेल्या निर्णयात न्यायालयाने हे मत व्यक्त केले. या निर्णयात न्यायालयाने नात्यातील विश्वासावरही महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदविले. पीडित मुलगी आरोपीला मामा म्हणत होती. त्यावरून ती आरोपीला किती सन्मान देत होती, हे दिसून येते. परंतु, आरोपीने या विश्वासाचा गैरफायदा घेऊन मुलीवर लैंगिक अत्याचार केला. त्याद्वारे आरोपीने मुलीच्या मनामध्ये नातेसंबंधाविषयी असणारा विश्वास कायमचा नष्ट केला. चांगली मानसिकता असणारी व्यक्ती असे कृत्य करू शकत नाही. त्यामुळे आरोपी हा विकृत व मुलीविषयी वाईट दृष्टी बाळगणाऱ्या प्रवृत्तीचा इसम असल्याचे आणि त्याच्या मनात मानवी नात्यासंदर्भात काहीच सन्मान नसल्याचे स्पष्ट होते, असे न्यायालय म्हणाले. तसेच, प्रकरणातील विविध पुरावे लक्षात घेता आरोपीला सत्र न्यायालयाने सुनावलेली १० वर्षे सश्रम कारावास व ५००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास १ वर्ष अतिरिक्त कारावासाची शिक्षा कायम ठेवली. या शिक्षेविरुद्ध आरोपीने दाखल केलेले अपील फेटाळण्यात आले.
तपास अधिकाऱ्याला दणकाप्रकरणाच्या तपासात हलगर्जीपणा केल्यामुळे मुलचेराचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक दुर्गानाथ साळी यांना न्यायालयाने दणका दिला. साळी यांनी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांद्वारे नोंदविण्यात आलेले मुलीचे बयान रेकॉर्डवर ठेवले नाही. उच्च न्यायालयाने ही बाब गांभीर्याने घेऊन भविष्यामध्ये कोणताही पोलीस अधिकारी अशी गंभीर चुक करू नये यासाठी साळी यांच्यावर योग्य कारवाई करण्याचा आदेश पोलीस महासंचालकांना दिला. तसेच, कारवाईचा अहवाल न्यायालयात सादर करण्यास सांगितले.
अशी घडली घटनाराहुल राजकुमार शिंगाडे (२८) असे आरोपीचे नाव असून तो आष्टी, ता. चामोर्शी येथील रहिवासी आहे. तो चपला-जोड्याचे दुकान चालवीत होता. ६ नोव्हेंबर २०१४ रोजी आरोपीने पीडित मुलीला दुकानात बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. मुलीने १२ नोव्हेंबर रोजी आईला घटनेची माहिती दिली. त्यानंतर वडिलांनी १३ नोव्हेंबर रोजी मुलचेरा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यावेळी पीडित मुलगी केवळ ५ वर्षे वयाची होती.