योगेश पांडे
नागपूर : भाजपच्या पदाधिकारी सना खान यांची जबलपूर येथे आरोपी अमित साहूने हत्या केल्याची बाब स्पष्ट झाली आहे. सना खान या २ ऑगस्टपासून बेपत्ता होत्या व त्यांचा पोलिस यंत्रणेकडून शोध सुरू होता. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सना खान यांचे अमित साहूच्या घरी २ ऑगस्ट रोजीच मोठे भांडण झाले होते. बराच वेळ त्यांच्या ओरडण्याचा आवाज येत होता व अचानक तो आवाज बंद झाला. तेव्हापासूनच सना या ‘आउट ऑफ रिच’ होत्या. या भांडणानंतरच अमितने सना यांची हत्या केल्याचा पोलिसांना संशय असून, शेजाऱ्यांनीदेखील हीच माहिती दिली आहे.
सना खान यांच्याशी अमितचे काही महिन्यांअगोदर लग्न झाले होते व जबलपूर पोलिसांनी याला दुजोरा दिला आहे. २ ऑगस्टपासून अमितदेखील फरार होता. पोलिसांनी ई-सर्व्हेलन्सच्या आधारे त्याला गोराबाजार भागातील एका कॉलेजसमोरून अटक केली. सना खान १ ऑगस्ट रोजी नागपुरातून निघाल्या होत्या व २ ऑगस्ट रोजी त्या जबलपूरला पोहोचल्या. त्यांनी त्यांच्या आईला सकाळी ६ व ७ वाजता दोन फोन करून पोहोचल्याची माहिती दिली होती. तसेच मुलाची चौकशी केली. त्यानंतर अमित व सना यांच्यात वाद झाला.
शेजारच्या व्यक्तींना वादाचा आवाजदेखील गेला होता. मात्र, काहीवेळातच आवाज येणे बंद झाले. त्यामुळे त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर सना खान यांचा कुणाशीही संपर्क झाला नाही. त्याच दिवसापासून अमित साहू हादेखील ढाबा बंद करून फरार झाला होता. सना खान यांची २ ऑगस्ट रोजीच हत्या झाल्याचा पोलिसांना संशय आहे. अमितच्या प्राथमिक चौकशीत त्याने घरातच सना खान यांची हत्या केल्याची बाब कबूल केली आहे.
अभद्र भाषेवरून झाला वाद
पोलिसांना अमित साहू व सना खान यांच्या लग्नाचे प्रमाणपत्र मिळाले आहे. त्या प्रमाणपत्राच्या सत्यतेची चौकशी सुरू आहे. मात्र दोघेही बिझनेस पार्टनर होते व अमितच्या ढाब्यातदेखील सना यांचे पैसे लागले होते. सना यांनी अमितला सोन्याची चेन गिफ्ट म्हणून दिली होती. दोघांमध्येही नेहमीच व्हिडीओ कॉलवर बोलणे व्हायचे.
काही दिवसांपासून ती चेन त्याच्या गळ्यात दिसत नव्हती. सना यांनी त्याला जेव्हाही विचारणा केली तेव्हा तो ती गोष्ट टाळायचा. त्याने चेनसह काही दागिने विकल्याचा सना यांना संशय आला होता. जबलपूरला पोहोचताच पैशांचा व्यवहार व अमित साहूने फोनवर वापरलेली अभद्र भाषा यावरून दोघांमध्ये वाद झाला होता. संतापलेल्या साहूने सना यांच्यावर लाकडी दांड्याने प्रहार केले व त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्याने दिवसभर घरातच त्यांचा मृतदेह ठेवला होता व रात्री उशिरा गाडीतून मृतदेह हिरन नदीच्या दिशेने नेला, अशी माहिती जबलपूर पोलिसांनी दिली आहे.
पोलिस पत्नीने सोडल्यापासून वाढला होता हव्यास
अमित साहूने पहिले एका महिला पोलिस कर्मचाऱ्याशी लग्न केले होते, मात्र अमितच्या बेकायदेशीर कृत्यांमुळे व्यथित होऊन तिने त्याला सोडले. दोघांमध्ये अनेकदा वाद होत होते. २०२१ मध्ये लॉकडाउनच्या वेळी अमित महाराष्ट्रातून महागडी दारू आणायचा आणि बेलखडू परिसरातील त्याच्या ढाब्यावर विकायचा. यातूनच त्याच्या पत्नीशी त्याचा वाद व्हायचा. त्याच्या पत्नीनेच पोलिसांना माहिती दिली होती व धाड टाकून लाखो रुपयांची दारू जप्त करण्यात आली होती. पत्नीने सोडल्यापासून अमितचा पैशांप्रति हव्यास वाढला होता. त्यातूनच त्याने सना खान यांच्याशी जवळीक वाढविली होती.
कार्यकर्त्यांना धक्का, पदाधिकाऱ्यांचे मात्र मौन
सना खान या भाजपच्या अल्पसंख्याक मोर्चाच्या कार्यकर्त्यांमध्ये ‘दीदी’ म्हणून ओळखल्या जायच्या. त्यांचा जनसंपर्क दांडगा होता. अगदी नवनिर्वाचित शहराध्यक्ष बंटी कुकडे यांचीदेखील त्यांनी जबलपूरला जाण्याअगोदर भेट घेतली होती. त्या गायब झाल्यापासून कार्यकर्त्यांमध्ये चिंता होती व हत्येची बातमी समजल्यावर त्यांना धक्का बसला. मात्र शहर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी या प्रकरणावर सुरुवातीपासूनच मौन ठेवले आहे. ही बाब अनेक कार्यकर्त्यांना खटकते आहे.