पत्नीची नोकरी घालवण्याचा प्रयत्न करणारा पती क्रूरच : हायकोर्टाचे निरीक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 10:38 PM2021-02-15T22:38:22+5:302021-02-15T22:39:50+5:30
High Court observation, family dispute पत्नीची नोकरी घालवण्याचे प्रयत्न आणि तिच्यावर निराधार गंभीर आरोप करणारा पती क्रूरच आहे, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोंदवून पत्नीला मिळालेला घटस्फोट रद्द करण्यास नकार दिला. न्यायमूर्तीद्वय अतुल चांदूरकर व पुष्पा गणेडीवाला यांनी हा निर्णय दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पत्नीची नोकरी घालवण्याचे प्रयत्न आणि तिच्यावर निराधार गंभीर आरोप करणारा पती क्रूरच आहे, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोंदवून पत्नीला मिळालेला घटस्फोट रद्द करण्यास नकार दिला. न्यायमूर्तीद्वय अतुल चांदूरकर व पुष्पा गणेडीवाला यांनी हा निर्णय दिला.
नागपूर येथील पत्नी ज्योती हिने पती आनंद व त्याच्या कुटुंबीयांच्या क्रूरतेच्या आधारावर घटस्फोट मिळवला आहे. त्यासंदर्भात कुटुंब न्यायालयाने २५ सप्टेंबर २०१४ रोजी निर्णय दिला आहे. त्याविरुद्ध आनंदने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाने ते अपील फेटाळून लावले. ज्योतीला लग्नापूर्वीपासून मज्जातंतू विकार असल्याचा गंभीर आरोप आनंदने केला होता. तसेच तो, ज्योतीने नोकरी मिळवण्यासाठी राजपूत भामटा जातीचे बनावट वैधता प्रमाणपत्र प्राप्त केले, असा खोटा प्रचार करून तिची नोकरी घालवण्याचा प्रयत्न करीत होता. आनंदची ही कृती क्रूरताजनक आहे, असे उच्च न्यायालयाने हा निर्णय देताना स्पष्ट केले.
दिवाळीत घराबाहेर काढले
ज्योती व आनंदचे २७ एप्रिल २००८ रोजी लग्न झाले होते. आनंद व त्याचे कुटुंबीय तिला सुरुवातीपासूनच वाईट वागणूक देत होते. तिच्यासोबत सतत भांडण करीत होते. २०१० मधील दिवाळीत ज्योतीला सोन्याचे सर्व दागिने हिसकावून घराबाहेर काढण्यात आले होते.