लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोणताही ठोस पुरावा नसताना पतीवर चारित्र्यहीनतेचा आरोप केला जाऊ शकत नाही. पत्नी असे आरोप करीत असेल तर, ती कृती पतीसोबतची क्रू रता ठरते असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील न्यायमूर्तीद्वय वासंती नाईक व स्वप्ना जोशी यांनी एका प्रकरणात दिला आहे.प्रकरणातील दाम्पत्य जिया व दीप (काल्पनिक नावे) नागपूर येथील रहिवासी असून त्यांनी २७ जून २०१२ रोजी प्रेम विवाह केला होता. त्याच्या तीन-चार वर्षांपूर्वी त्यांची ओळख झाली होती. ओळखीचे रुपांत प्रेमात झाले होते. जिया लग्नानंतर दोनच महिन्यात माहेरी निघून गेली. त्यानंतर तिने कुटुंब न्यायालयात घटस्फोटासाठी याचिका दाखल केली. त्यात तिने दीपविरुद्ध विविध गंभीर आरोप करून दीपची क्रूरता सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. परंतु, सर्व आरोप तथ्यहीन आढळून आल्यामुळे न्यायालयाने तिची याचिका खारीज केली. जियाच्या आरोपांमुळे दीप दुखावला गेला होता. परिणामी, त्याने जियासोबत संबंध तोडण्याचा निर्णय घेऊन जियाच्या क्रूरतेच्या आधारावर घटस्फोट मिळण्यासाठी कुटुंब न्यायालयात याचिका दाखल केली. ३१ जुलै २०१७ रोजी ती याचिका मंजूर झाली. त्या निर्णयाविरुद्ध जियाने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता तिचे अपील फेटाळून कुटुंब न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला.कुटुंब न्यायालयात बयान देताना जियाने दीपवर चारित्र्यहीनतेचा आरोप केला. दीपचे त्याच्या मित्राच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचे ती म्हणाली. परंतु, याबाबत तिला ठोस पुरावा सादर करता आला नाही. उच्च न्यायालयाने जियाचे हे वागणे क्रूरतापूर्ण ठरवले. ठोस पुरावा नसताना पतीवर चारित्र्यहीनतेचा आरोप करणे चुकीचे आहे. ही कृती क्रूरतेमध्ये मोडते असे न्यायालयाने स्पष्ट करून पत्नीला दणका दिला. या निर्णयाविरुद्ध पत्नी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असून त्यासाठी हा निर्णय १० आठवड्यांसाठी स्थगित ठेवण्यात आला आहे.
पुरावा नसताना पतीवर चारित्र्यहीनतेचा आरोप केला जाऊ शकत नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2018 1:32 AM
कोणताही ठोस पुरावा नसताना पतीवर चारित्र्यहीनतेचा आरोप केला जाऊ शकत नाही. पत्नी असे आरोप करीत असेल तर, ती कृती पतीसोबतची क्रू रता ठरते असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील न्यायमूर्तीद्वय वासंती नाईक व स्वप्ना जोशी यांनी एका प्रकरणात दिला आहे.
ठळक मुद्देहायकोर्टाचा पत्नीला दणका : घटस्फोटाविरुद्धचे अपील फेटाळले