नागपूर : पत्नीने दारुसाठी हटकल्यामुळे पतीने मनाला लावून घेत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना राजीवनगरात उघडकीस आली. रोहित मुकेश शिंगाडे (२०) रा. तुमसर असे मृत युवकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित हा मूळचा भंडारा जिल्ह्यातील तुमसरचा रहिवासी आहे. त्याचे शेजारी राहणाऱ्या निकिताशी (२०) सूत जुळले. दोघांच्या प्रेमसंबंधाची वस्तीत चर्चा होती. त्यामुळे निकिताच्या कुटुंबीयांनी तिला विरोध करीत शिक्षण बंद केले. मात्र, रोहितने तिला थेट पळवून आणले आणि प्रेमविवाह केला.
एक वर्षांपूर्वी ते कामाच्या शोधात नागपुरात आले. त्याला एमआयडीसीतील एका कंपनीत काम मिळाले. दोघांनीही सुखी संसार सुरू केला. त्यांना चार महिन्यांचा मुलगा आहे. मात्र, यादरम्यान रोहितला दारुचे व्यसन जडले. तो रोज दारू पिऊन घरी यायचा, त्यामुळे निकिता नेहमी हटकत होती. दारुवरुन दोघांत नेहमी खटके उडत होते. दरम्यान, २८ डिसेंबरला तो रात्री नेहमीसारखाच दारू पिऊन घरी आला, व त्याला निकीताने हटकले. त्यामुळे त्याने दुसऱ्या दिवशी सकाळी साडेनऊ वाजता घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.