नागपूर : सत्र न्यायालयाने आरोपी पती, सासू व दिराला हुंडाबळीच्या गुन्ह्यात दोषी ठरवून सात वर्षे सश्रम कारावासाची कमाल शिक्षा सुनावली. न्या. आर. एस. पावसकर यांनी शुक्रवारी हा निर्णय दिला. ही घटना कुही तालुक्यातील आहे.
उमेश कवडू ठवकर (३०), लीलाधर ऊर्फ सचिन (२७) व कमलाबाई (६०) अशी आरोपींची नावे आहेत. ते आकोली येथील रहिवासी आहेत. उमेश हा पती, लीलाधर दीर, तर कमलाबाई सासू होय. या तिघांना हुंड्यासाठी छळाच्या गुन्ह्यात तीन वर्षे सश्रम कारावास व २५ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास नऊ महिने अतिरिक्त कारावास, अशी शिक्षादेखील सुनावण्यात आली आहे.
मृताचे नाव अंकिता होते. ती राजुरा, ता. चांदूर रेल्वे, जि. अमरावती येथील रहिवासी होती. तिचे १६ एप्रिल २०१६ रोजी उमेशसोबत लग्न झाले होते. उमेश व्यवसायाने वाहन चालक होता. अंकिताच्या वडिलाला अंकितासह तीन मुली होत्या. मुलगा नसल्यामुळे दोन एकर शेत अंकिताच्या नावावर करण्यात आले होते. त्या लोभापोटी लग्नानंतर आरोपींनी अंकिताला हुंड्यासाठी छळणे सुरू केले. आरोपींनी अंकिताला माहेरून दोन लाख रुपये व सोन्याची चेन आणण्याची मागणी केली, तसेच दोन एकर शेत विकून पैसे आणण्यास सांगितले.
वडील रमेश भोयर अंकिताला भेटण्यासाठी गेले असता तिने त्यांना सर्व हकीकत सांगितली होती. त्यावेळी रमेश यांनी आरोपींची समजूत काढली होती; परंतु आरोपींच्या वागण्यात बदल झाला नाही. त्यांनी अंकिताचे माहेरच्या मंडळींसोबत बोलणे बंद केले. परिणामी, अंकिता प्रचंड मानसिक तणावात सापडली. दरम्यान, तिने सततच्या छळाला कंटाळून ३ ऑक्टोबर २०१६ रोजी कीटकनाशक प्राशन केले. त्यामुळे तिचा मृत्यू झाला. न्यायालयात सरकारच्या वतीने ॲड. दीपक गादेवार यांनी कामकाज पाहिले.