नागपूर : पतीचा स्वत:चे गैरवर्तन लपवून पत्नीला क्रूर ठरवण्याचा प्रयत्न मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हाणून पाडला. न्यायालयाने रेकॉर्डवरील पुरावे लक्षात घेता पतीला त्याच्या स्वत:च्या चुकीचा फायदा घेऊ दिला जाऊ शकत नाही, असे स्पष्ट करून त्याची घटस्फोट मिळण्याची मागणी फेटाळून लावली.
न्यायमूर्तीद्वय अतुल चांदूरकर व नितीन सूर्यवंशी यांनी हा निर्णय दिला. नागपूर येथील दाम्पत्य कार्तिक व विनिता (बदललेली नावे) यांचे ८ मे २००७ रोजी लग्न झाले असून त्यांना एक मुलगी आहे. कार्तिकने घटस्फोट मिळवण्यासाठी विनितावर विविध आरोप केले होते. कार्तिक मांगलिक असून त्याला मांगलिक मुलीसोबत लग्न करायचे होते. विनिताने स्वत:ला मांगलिक दाखवण्यासाठी चुकीची जन्मतारीख सांगितली. लग्नानंतर ती सतत एकाकी रहात होती. सासरी कुणासोबतही जास्त बोलत नव्हती. परंतु, माहेरच्या व्यक्तींसाेबत तासनतास संवाद साधत होती. १९ जून २००९ रोजी ती कुणालाही न सांगता माहेरी निघून गेली. तिने कार्तिक व त्याच्या कुटुंबीयांविरुद्ध पोलीस ठाण्यात खोटी तक्रार नोंदवली. त्यानंतर कार्तिकने तिला परत आणण्याचा प्रयत्न केला, पण तिने काहीच प्रतिसाद दिला नाही असे न्यायालयाला सांगण्यात आले होते. परंतु, न्यायालयाला रेकॉर्डवरील पुराव्यांवरून यापेक्षा भिन्न चित्र दिसून आले. लग्नानंतर दोन वर्षे कार्तिक व विनिता आनंदात राहिले. दरम्यान, विनिताने चुकीची जन्मतारीख सांगितल्याचे कळल्यानंतर कार्तिकची वागणूक बदलली. तो तिचा छळ करायला लागला. १९ जून २००९ रोजी त्याने विनिताला जबर मारहाण केली. परिणामी, विनिता जीवाच्या भीतीमुळे माहेरी निघून गेली. याशिवाय कार्तिकचे विनितावरील अन्य आरोपही सिद्ध होऊ शकले नाहीत. परिणामी, न्यायालयाने त्याला घटस्फोट देण्यास नकार दिला. सुरुवातीला कुटुंब न्यायालयाने घटस्फोट नाकारल्यामुळे कार्तिकने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. ते अपील फेटाळून कुटुंब न्यायालयाचा निर्णय योग्य ठरवण्यात आला.