लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गणेशपेठ मध्यवर्ती बसस्थानकाजवळील रजत संकुल येथे झालेल्या लक्ष्मण मलिक हत्याकांडाचे रहस्य अखेर उघडकीस आले आहे. खापरखेडा येथे पॉर्न साईट पाहून जशी प्रियकराची हत्या करण्याचा प्लॅन तरुणीने केला होता, अगदी तशाच पद्धतीने पतीला पॉर्न साईट दाखवून मलिक यांच्या पाचव्या पत्नीने ही हत्या केली. स्वाती लक्ष्मण मलिक (३१) असे आरोपी पत्नीचे नाव आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुरुवारी सकाळी पत्रपरिषदेत ही माहिती दिली.
८ मार्च रोजी दुपारी ६५ वर्षीय मलिक यांची खुर्चीला बांधून गळा कापून हत्या करण्यात आली होती. ९ मार्चच्या सकाळी मृतदेह आढळून आल्याने ही हत्या उघडकीस आली. मलिक यांना पाच पत्नी होत्या. पत्नी व मुलांच्या उदरनिर्वाहावरून त्यांच्यात वाद सुरू होता. मलिकने अनेक लोकांकडून नोकरी लावून देण्याच्या नावावर पैसे घेतले होते. त्यामुळे त्यांच्या हत्येचे अनेक कारण समोर येत असल्याने पोलिसही गोंधळात पडले होते. लोकमतने सुरुवातीपासूनच या हत्येत जवळच्याच व्यक्तीचा हात असल्याचा संशय व्यक्त केला होता. पोलिसांना तपासादरम्यान मलिक यांचे ८ मार्च रोजी दुपारी स्वातीसोबत बोलणे झाल्याचे समजले. पोलिसांनी याबाबत स्वातीला विचारणा केली, तेव्हा ती घरीच असल्याचे सांगितले होते. पोलिसांनी त्या वेळेच्या लोकेशनचा पत्ता लावला असता, ती रजत संकुलमध्ये येऊन गेल्याचे आढळून आले. ती धरमपेठ येथे आई-वडिलांसोबत राहते. तेथून ती टॅक्सी बुक करून एसटी स्टॅन्डवर आली होती. बुधवारी रात्री संबंधित टॅक्सी चालकही पोलिसांच्या हाती लागला. त्याने एका महिलेला धरमपेठ येथून रजत संकुलजवळ सोडल्याचे सांगितले. ती महिला स्वाती असल्याची पुष्टी होताच, पोलिसांना सर्व प्रकार लक्षात आला. पोलिसांनी आज सकाळीच स्वातीला ताब्यात घेतले. तिला सक्तीने विचारणा केली तेव्हा तिने खुनाची कबुली दिली.
स्वातीचे १० वर्षांपूर्वी मलिकसोबत लग्न झाले होते. घटस्फोटित महिला असल्याने स्वाती त्याच्याशी लग्न करण्यास तयार झाली होती. ती मलिकची पाचवी पत्नी होती. त्याच्याकडून स्वातीला आठ वर्षांचा मुलगा आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून त्यांच्या नात्यात तणाव निर्माण झाला होता. बुटीक चालविणाऱ्या स्वातीला नवीन जोडीदार मिळाला होता. स्वाती त्याच्यासोबत राहत होती. मलिकला पेन्शन मिळत होती. पेन्शन खात्याचे एटीएम कार्ड स्वातीजवळ होते. मलिक तिला आपले एटीएम परत मागत होता. ती यासाठी तयार नव्हती. म्हणून दोघांमधील वाद वाढला. स्वातीने तीन महिन्यापूर्वीच मुलीला जन्म दिला आहे. तेव्हापासून मलिक त्याच्या आठ वर्षीय मुलाचे पालकत्व मागत होता. त्याचे म्हणणे होते की, तिला नवीन साथीदाराकडून मुलगी झाली, त्यामुळे तो तिला आपली पेन्शन देऊ शकत नाही. तेव्हा स्वाती मावशी नवजात बाळाला दत्तक घेणार असल्याचे सांगून त्याला शांत करायची. पाचवेळा लग्न केल्यानंतरही मलिक इतर महिलांवर नजर टाकायचा. यामुळेच स्वातीने त्याला जीवे मारण्याची योजना आखली. स्वातीला हे माहीत होते की, मलिकला एकटे मारता येऊ शकत नाही. त्यामुळे मलिकच्या सवयी माहीत असल्यामुळे मागील काही दिवसापासून स्वाती पॉर्न साईट पाहून खून करण्याची योजना शोधत होती. स्वातीला खापरखेडा दहेगाव रंगारी येथे एका युवतीने पॉर्न साईट पाहून प्रियकराची हत्या केल्याची माहिती होती. त्याच आधारावर तिने मलिकचा खून करण्याचे ठरविले. ती ८ मार्च रोजी दुपारी टॅक्सीने रजत संकुलला आली. मलिकला पॉर्न साईट दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी उत्तेजित केले. पॉर्न साईटमध्ये दाखविल्याप्रमाणे मलिकला खुर्चीवर बसवून त्याचे दोन्ही हात मागे बांधले. यानंतर चाकूने त्याचा गळा कापला. यानंतर ती ऑटोने घरी परत आली.
ही कारवाई अप्पर आयुक्त सुनील फुलारी, डीसीपी गजानन राजमाने, एसीपी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनात पीआय संदीपान पवार, कुमरे, एपीआय पवन मोरे, एएसआय रफीक खान, हवालदार दशरथ मिश्रा, अनिल जैन, रामचंद्र कारेमोरे, श्याम अंगुथलेवार, प्रशांत लाडे, श्याम कडू, प्रवीण गोरटे, अनुप तायवाडे, टप्पू चुटे, संदीप भावळकर, संतोष चौधरी सायबरचे एपीआय विशाल माने, पीएसआय बलराम झाडोकर, शिपाई सूरज आणि सुहास यांनी केली.
थंड डोक्याने आखली योजना
स्वाती अतिशय चतूर महिला आहे. तिने चार वर्षांपूर्वीसुद्धा मलिकची एक पत्नी आणि तिच्या मित्राविरुद्ध अंबाझरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्या दोघांनी तिला खुर्चीवर बांधून तिच्याशी आपत्तीजननक व्यवहार केल्याचे सांगितले होते. स्वातीच्या मोबाईलची तपासणी केल्यावर पोलिसांना अनेक गोष्टींची माहिती मिळाली. तिने अतिशय थंड डोक्याने खून केला. आपण पकडले जाणार नाही, याचा तिला पूर्ण विश्वास होता. परंतु एका चुकीमुळे ती सापडली.