नागपूर : मेंदूत रक्तस्राव होऊन ब्रेन डेड झालेल्या पतीच्या असह्य दु:खातही स्वत:ला सावरत पत्नीने आपल्या माणसाचे अस्तित्व कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. या पुढाकारामुळे मंगळवारी तिघांना जीवनदान तर दोघांना दृष्टी मिळाली. २०१३ पासून ते आतापर्यंतचे हे ७५ वे अवयवदान ठरले.
विजय रंगारी (५०), चांडकपुरा खापरखेडा सावनेर असे अवयवदात्याचे नाव. ‘झोनल ट्रान्सप्लान्ट कोऑर्डिनेशन सेंटर’ने (झेडटीसीसी) दिलेल्या माहितीनुसार, रंगारी यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने ११ ऑगस्ट रोजी न्यू इरा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न सुरू असताना ‘ब्रेन डेड’ म्हणजे मेंदू मृत झाला. डॉ. अश्विनी चौधरी यांनी शोकाकुल कुटुंबीयांना याची माहिती देत अवयवदानाचे आवाहनही केले. विजय रंगारी यांच्या पत्नी रोशनी रंगारी व त्यांच्या मुलांनी पुढाकार घेत अवयवदानासाठी पुढाकार घेतला. याची माहिती ‘झेडटीसीसी’च्या अध्यक्ष डॉ. विभावरी दाणी व सचिव डॉ. संजय कोलते यांना देण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनात झोनल कोऑर्डिनेटर वीणा वाठोडे यांनी पुढील प्रक्रिया पूर्ण केली. रंगारी यांचे यकृत, दोन्ही मूत्रपिंड व बुबूळ दान करण्यात आले. अवयवदान सप्ताहात झालेले हे दुसरे अवयवदान आहे.
-१२७ वे यकृत प्रत्यारोपण
नागपुरात २०१६ पासून न्यू इरा हॉस्पिटलमध्ये यकृत प्रत्यारोपणाला सुरुवात झाली. तेव्हापासून ते आतापर्यंत १२७ यकृत प्रत्यारोपण होऊन या अवयवाच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णाला नवे आयुष्य मिळाले. रंगारी यांचे यकृत न्यू इरा हॉस्पिटलमधील ६९ वर्षीय पुरुषाला देण्यात आले. प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया डॉ. राहुल सक्सेना यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
-आतापर्यंत मूत्रपिंडाचे १३१वे दान
२०१३ पासून ते आतापर्यंत ७५ ब्रेन डेड व्यक्तीकडून १३१ मूत्रपिंड दान झाले. आज झालेल्या या दानामुळे न्यू इरा हॉस्पिटलच्या ३१ वर्षीय युवकावर तर वोक्हार्ट हॉस्पिटलच्या ५१ वर्षीय पुरुष रुग्णावर प्रत्यारोपण करण्यात आले. ही शस्त्रक्रिया मूत्रपिंड प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. संजय कोलते व डॉ. शिवनारायण आचार्य यांच्या नेतृत्वात करण्यात आले. दोन्ही बुबूळ माधव नेत्रपेढी यांना दान करण्यात आले.