घटस्फोटाचा मुद्दा : प्रकरण कुटुंब न्यायालयाकडे परत नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने वैवाहिक वादाचे प्रकरण पुनर्निर्णयासाठी कुटुंब न्यायालयाकडे परत पाठवून पतीला दिलासा दिला. प्रकरणातील दाम्पत्य अमित व अपेक्षा (काल्पनिक नावे) नागपूर येथील रहिवासी असून ३१ मे २०१० रोजी त्यांचे लग्न झाले. अपेक्षाने विवाहाधिकार प्राप्तीसाठी तर, अमितने विवाह अवैध ठरविण्यासाठी कुटुंब न्यायालयात याचिका दाखल केली होती. कुटुंब न्यायालयाने अपेक्षाची याचिका मंजूर तर, अमितची याचिका खारीज केली. या निर्णयाविरुद्ध अमितने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाने अपील अंशत: मंजूर करून वरीलप्रमाणे निर्णय दिला. तसेच, दोन्ही पक्षकारांना ३ एप्रिल रोजी कुटुंब न्यायालयासमक्ष हजर होण्यास सांगितले.अपेक्षा मानसिक आजारी आहे. ती कशालाही घाबरते. लग्न करण्यापूर्वी आजाराची माहिती देण्यात आली नाही. महिला समुपदेशकाकडे नेल्यानंतर अपेक्षाने अश्लील शब्दांत शिवीगाळ केली. ती संयुक्त कुटुंबात राहण्यास तयार नाही, असे अमितचे आरोप आहेत. लग्नानंतर काही दिवसांतच अमित व त्याच्या कुटुंबीयांचे वागणे बदलले. अमित चारित्र्यावर संशय घेतो. ४ लाख रुपयांची मागणी करतो. शिवीगाळ व मारहाण करतो. सासरची मंडळी उपाशी ठेवतात. हातातील पाणी हिसकावून घेतात, असे आरोप अपेक्षाने केले आहेत. कुटुंब न्यायालयाने निर्णय देताना हे सर्व मुद्दे योग्य पद्धतीने विचारात घेतले नाहीत, असे निरीक्षण करून उच्च न्यायालयाने प्रकरण परत पाठविताना नोंदविले.(प्रतिनिधी)
पतीला हायकोर्टाचा दिलासा
By admin | Published: March 08, 2017 2:40 AM