लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बायकोच्या वर्तनाने त्रस्त झालेल्या नवऱ्याची संख्या सारखी वाढत आहे. गेल्या ११ महिन्यात १३४ पुरुषांनी मुजोर आणि भांडकुदळ महिलांच्या विरोधात पोलिसांच्या भरोसा सेलकडे तक्रारी नोंदविल्या आहेत. तर, अंतर्गत वाद चव्हाट्यावर येऊ नये, प्रतिष्ठा धुळीला मिळू नये म्हणून शेकडो पुरुष पोलिसांकडे तक्रार देण्याऐवजी नात्यातील मंडळींकडे दाद मागत आहेत. उपराजधानीतील हे वास्तव चक्रावून सोडणारे आहे.
नवऱ्याच्या जाचाला कंटाळून पोलिसांकडे तक्रार करणाऱ्या महिलांची संख्या सर्वत्र आहे. दारू पिऊन विनाकारण मारहाण करतो, चारित्र्यावर संशय घेतो, घरात लक्ष देत नाही, जबाबदारी पार पाडत नाही, हुंड्यासाठी छळ करतो. महिलांच्या तक्रारीचे असे स्वरूप आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून बायकोच्या विरोधात तक्रारी करणाऱ्या पुरुषांची संख्याही वाढत आहे. गेल्या ११ महिन्यात १३४ पत्नीपीडित पुरुषांनी पोलिसांकडे धाव घेऊन पत्नीच्या विरोधात कैफियत गुदरली आहे. बहुतांश तक्रारी पत्नीच्या संशयास्पद वर्तनाच्या आहेत. नोकरी, धंदा अथवा अत्यावश्यक कामाच्या निमित्ताने पती बाहेर गेला की पत्नी घरून निघून जाते. कधी दिवसभर तर कधी रात्रभर गायब असते. अनेकदा विशिष्ट व्यक्ती घरी येतात, असे या तक्रारींचे स्वरूप आहे.
विशिष्ट क्रमांकावरून तिच्या मोबाईलवर वारंवार फोन येतात. ‘तो घरात आहे, आता बोलता येणार नाही. ऑनलाईन ये. तो आला. आता बोलता येणार नाही. ठेवते मी,’ हे तिचे वाक्य नवऱ्याच्या काळजात खंजीर खुपसून जाते. तिला काही काम सांगितले की तिटकारा येतो. बरे नाही, नंतर करेन, असे सांगून रात्रंदिवस ती मोबाईलमध्ये गुंतून राहते. टोकले की मुजोरी करते. भांडण करते आणि वारंवार माहेरी निघून जाते, अशाही तक्रारी नवऱ्यांकडून येत आहेत. बायकोच्या हातात रात्रंदिवस मोबाईल दिसत असल्याने नवरे वैतागले आहेत. अनेक कुटुंबातील संशयकल्लोळही वाढला आहे. या पार्श्वभूमीवर, भरोसा सेलमध्ये तक्रारीची संख्या वाढत आहे. गेल्या ११ महिन्यात १३४ पत्नीपीडितांनी तक्रारी नोंदविल्या आहेत. त्यातील ७० टक्के तक्रारींचे निराकरण करून भराेसा सेलच्या पोलिसांनी संसाराची विस्कटलेली घडी व्यवस्थित करण्याची भूमिका वठविली आहे.
काही प्रकरणात विवाहबाह्य संबंधही उघड झालेले आहेत. अशा प्रकरणात पोलिसांना कायद्याच्या चौकटीत राहूनच काम करावं लागतं.
-----
तक्रारी :
१ जानेवारी ते ३० नोव्हेंबर २०२०
जानेवारी : ०५
फेब्रुवारी : १८
मार्च : १२
एप्रिल : ०७
मे : ०६
जून : १९
जुलै : १४
ऑगस्ट : ०९
सप्टेंबर : १५
ऑक्टोबर : २०
नोव्हेंबर : ०९
-----
एकूण तक्रारी : १३४
निराकरण : ७०
------
महत्त्वाची कारणे
काम सांगितले की तिटकारा.
नुसती मोबाईलमध्येच गुंतून राहते.
लपूनछपून बोलणी, सलग चॅटिंग.
मुजोरी करणे, वारंवार माहेरी निघून जाणे
---
पुरुषांच्या तक्रारींची संख्या वाढत आहे, हे खरे असले तरी पोलिसांकडून योग्य समुपदेशन होत असल्याने तुटू पाहणारे संसार जोडण्यात आम्ही यशस्वी ठरलो आहे.
- उज्ज्वला मडावी, पोलीस उपनिरीक्षक, भरोसा सेल, नागपूर.