पत्नीचा रक्ताच्या कर्करोगाशी संघर्ष : ढाले कुटुंबाला हवे जगण्याचे बळनागपूर : रक्ताचा कर्करोग झालेल्या पत्नीला वाचविण्यासाठी पतीने गुजरातजवळील केंद्रशासित प्रदेश येथून नागपूर गाठले. मित्र, नातेवाईकांकडून उसनवारी घेऊन उपचार सुरू केले. पैसे कमी पडत असल्याचे पाहत दागिनेही विकले. आता हातचे संपले. पत्नीला वाचविण्यासाठी सलग दोन वर्षे उपचार घेणे आवश्यक आहे. यासाठी पाच-सहा लाखांची गरज असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. पत्नीवर उपचार करण्याची पतीची परिस्थिती राहिली नाही. पत्नीला जगवावे तरी कसे, या चिंतेने या गरीब कुटुंबाचे जीणे हराम झाले आहे. पत्नीच्या उपचारासाठी काही करण्याची जिद्द बाळगून असलेले आनंद ढाले त्या पतीचे नाव. वृंदावन सोसायटी डोकमरडी, सिल्व्हासा, दादरा नगर हवेली केंद्रशासित प्रदेश (गुजरातजवळील) येथील ते रहिवासी आहेत. येथेच ते एका खासगी कंपनीत कामाला आहेत. पत्नी आम्रपाली ढाले (२९) हिला २१ मे रोजी रक्ताचा कर्करोग असल्याचे कळताच या कुटुंबावर कुऱ्हाड कोसळली. पत्नी आम्रपालीला वाचविण्यासाठी पतीची धडपड सुरू आहे. पण दारिद्र्यासमोर त्यांचे सर्व प्रयत्न थिटे पडत आहेत. आनंद ढाले यांनी ‘लोकमत’ला आपली आपबिती सांगितली. ते म्हणाले, हिंगणघाट ही सासूरवाडी आहे. मे महिन्यात लग्नासाठी आलो. दोन दिवस बरे गेले. परंतु तिसऱ्या दिवशी अचानक पत्नीच्या दातातून आणि लघवीच्या ठिकाणाहून रक्तस्राव होऊ लागला. लगेच तिला सेवाग्रम हॉस्पिटलमध्ये दाखविले. तिथे ‘बोनमॅरो’ची तपासणी केली. यात ‘एपीएमएल’ प्रकाराचा रक्ताच्या कर्करोगाचे निदान झाले. अचानक आलेल्या या संकटाने घाबरून गेलो. काय करावे कळत नव्हते. पाच वर्षांची मुलगी आणि अकरा महिन्याचे तान्हे बाळ हातात होते.तेव्हा एकच जिद्द पकडली आम्रपालीला बरे करायचे. तेथून थेट नागपूरच्या मेडिकलमध्ये आलो. परंतु येथील डॉक्टरांनी रक्ताच्या कर्करोगाचे डॉक्टर नसल्याचे सांगून हेमॅटोलॉजिस्ट डॉ. ए.के. गंजू यांच्याकडे जाण्याचा सल्ला दिला. २३ मेपासून पत्नी डॉ. गंजू यांच्याकडील अतिदक्षता विभागात उपचार घेत आहे. केमोथेरपी सुरू आहे. मित्रांकडून उसनवारीने घेतलेल्या दोन लाख रुपयांमधून उपचाराचा खर्च भागवला. आता हातचे सर्वच संपले. पत्नीला वाचविण्यासाठी डॉक्टरांनी आणखी दोन वर्षे उपचार घेण्याचे सांगितले आहे. यात पाच-सहा लाख रुपयांची गरज असल्याचे पत्रच डॉक्टरांनी दिले असल्याचे ढाले म्हणाले. समाजाचे आर्थिक पाठबळ मिळाल्यास पत्नी वाचेल, ही एकमेव आशा पती आनंद ढाले बाळगून आहेत. ढाले यांचा आता कुठे संसार फुलला होता. ५ वर्षांची मुलगी आणि ११ महिन्यांपूर्वी जन्मलेल्या मुलाने कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. परंतु नियतीचे चकरे फिरले आणि काही कळण्याच्या आतच कठोर आघात सोसण्याची वेळ या कुटुंबावर आली. त्यांना गरज आहे ती समाजाच्या मदतीची. हीच मदत या कुटुंबाला पुन्हा एकदा लढण्याचे बळ-जगण्याची उभारी देऊ शकते. आनंद ढाले यांना मदत करू इच्छिणाऱ्यांनी कॅनरा बँक, शाखा सिलवासा, अकाऊंट नंबर २५६५१०१००९५५१ आयएफएससी : सीएनआरबी०००२५६५ यावर धनादेश अथवा धनाकर्ष पाठवून मदत करावी. ढाले यांच्याशी ९५५८०५३६६७ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.(प्रतिनिधी)
पत्नीला जगविण्यासाठी पतीची धडपड
By admin | Published: June 22, 2016 2:49 AM