लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नकली रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या आरोपींचे रॅकेट १५ दिवसांपासून कार्यरत होते. या रॅकेटशी भांडे प्लाट चौकातील काही स्वयंघोषित नेते आणि गुन्हेगारही जुळले होते. नकली रेमडेसिविरची विक्री करणारे आरोपी गरजू रुग्णांच्या नातेवाइकांना आपल्या जाळ्यात ओढत होते. यादरम्यान पोलिसांनी या रॅकेटमधील तिसऱ्या सदस्यालाही अटक केली.
सक्करदरा पोलिसांनी सामाजिक कार्यकर्ते व किंग कोबरा ऑर्गनाइजेशनचे प्रमुख अरविंद कुमार रतुडी आणि त्यांच्या साथीदाराच्या मदतीने मिरची बाजारातील एका खासगी रुग्णालयाजवळ या रॅकेटला रंगेहाथ पकडले होते. एक्स-रे टेक्निशियन अभिलाष देवराव पेठकर (२८) रा. न्यू सभेदार ले-आऊट आणि अनिकेत मोरेश्वर नंदेश्वर (२१) रा. तुकडोजी चौक मानेवाडा यांना अटक करून त्यांच्याजवळून दोन रेमडेसिविर इंजेक्शन जप्त केले होते. आरोपी २८ हजार रुपयांत इंजेक्शन विकत होते. तज्ज्ञांना दाखविल्यानंतर रेमडेसिविर इंजेक्शन नकली असल्याचे स्पष्ट झाले. आरोपी अभिलाष देवराव पेठकरची पत्नी नर्स आहे. तिने पत्नीला कामावरून इंजेक्शन मिळाल्याचे सांगिततले; परंतु पोलिसांना तिच्या बोलण्यावर विश्वास नाही. पोलिसी खाक्या दाखविताच आरोपीने आपल्या तिसऱ्या साथीदाराचे नाव सांगितले. यानंतर सुमित सुखदेव मनोहर (३५) सिरसपेठ, इमामवाडा यालाही अटक करण्यात आली. सुमितने पीडित गरजू नातेवाइकांची अभिलाष व अनिकेतसोबत भेट घडवून आणली होती. सुमितचीही पत्नी नर्स आहे.
सूत्रानुसार आरोपी रुग्णालयात उपयोगात आणल्या जाणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनची बॉटल मिळवायचे. त्यात सिरिंजने द्रवपदार्थ टाकायचे. रबरच्या झाकन लिकेज होऊ नये म्हणून ते फेव्हीक्वीकने चिकटवायचे. आरोपी मागील १५ दिवसांपासून हे रॅकेट चालिवत होते. घरीच उपचार करणाऱ्या रुग्णाला ते प्राधान्य द्यायचे. इंजेक्शन खरेदी केल्यानंतर रुग्णाला ते इंजेक्शन नकली असल्याचे आढळून यायचे; परंतु रुग्णाचे नातेवाईकही भीतीमुळे कुणाला काही सांगत नव्हते. काही जण आरोपीला आपले पैसे परत मागायचे. पैसे परत मागणारा वरचढ ठरत असेल तर त्याला पैसे परत केले जायचे, अन्यथा आरोपी मोबाइल बंद करून ठेवीत. या रॅकेटशी सक्करदरा पोलीस ठाणे परिसरातील स्वयंघोषित नेते व गुन्हेगारही जुळले असल्याचे सांगितले जाते. ते पोलीस अधिकाऱ्यांना फोन करून दडपण टाकण्याचा प्रयत्न करीत होेते; परंतु सामाजिक कार्यकर्त्यांच्या तत्परतेने त्यांचे काही चालले नाही. सामाजिक कार्यकर्ते अरविंद रतुडी यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
एफडीए प्रशासन कुंभकर्णी झोपेत
रेमडेसिविर आणि औषधांचा सर्रासपणे काळाबाजार होत आहे. यानंतरही एफडीए प्रशासन कुंभकर्णी झोपेत आहेत. या कारवाईनंतर पोलिसांनी लगेच इंजेक्शनच्या तपाासणीसाठी एफडीए अधिकाऱ्यांशी संपर्क केला; परंतु मंगळवारी एफडीए अधिकाऱ्यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही. कारवाईच्या २४ तासांनंतर एफडीएने विचारपूस केली. रेमडेसेविरच्या तुटवड्यामुळे रुग्णांचे जीव जात आहेत. परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे. अशावेळेही एफडीए प्रशासनाकडून कुठलीही तत्परता दिसून न येणे हे अतिशय गंभीर आहे. रेमडेसिविरच्या काळ्याबाजारात एफडीए अधिकाऱ्यांचाही सहभाग असल्याचा आरोप पीडित करीत आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल व्हायला हवेत.